कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयामध्ये नॉन-कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी येत असली तरी अजूनही पॉझिटिव्ह येत असलेले रुग्ण प्राधान्याने सीपीआरमध्येच येत आहेत. त्यामुळे हा महिना संपताना याबाबत काहीतरी निर्णय होईल, असे सांगण्यात येते.गेले काही महिने सीपीआरमध्ये केवळ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोविड समर्पित रुग्णालय म्हणून सीपीआरला दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे अन्य आजाराच्या रुग्णांवर उपचार करणे थांबविण्यात आले आहे. या ठिकाणी केवळ आणि केवळ कोरोना रुग्णांना प्राधान्य देऊन त्याच पद्धतीने या ठिकाणची सध्याची कार्यपद्धती ठरविण्यात आली आहे. याचा भार सेवा रुग्णालयावर पडला आहे.सध्या कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. त्यामुळे पुन्हा सीपीआरमध्ये सर्व प्रकारचे उपचार सुरू होणार का, अशी विचारणा केली जात आहे. याबाबत काही वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता लगेचच असा निर्णय होणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. कारण अजूनही कोरोना संपलेला नाही. अशातच विविध सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. दुकाने सुरू आहेत. सणासुदीचे वातावरण आहे. परिणामी कोरोनाची भीती अजूनही कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर ही संख्या कमीच येत राहिली तर कोरोना रुग्णांसाठी सीपीआर परिसरातील एखादी स्वतंत्र इमारत आणि स्वतंत्र स्टाफ अशी व्यवस्था करता येईल का, याचाही विचार एकीकडे सुरू आहे. परंतु यातील काहीच तातडीने होणार नाही. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी कोरोनाच्या स्थितीचा अभ्यास करून याबाबत निर्णय घेतला जाईल. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य यंत्रणांनाही विश्वासात घेऊन मग निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे
सीपीआरमध्ये अजूनही कोरोनाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनापश्चात वैद्यकीय प्रश्न निर्माण झालेलेही नागरिक संदर्भसेवेसाठी येत आहेत. या सर्व बाबींचा विचार करता, कोरोनाच्या स्थितीचा विचार करून याबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसारच निर्णय घेतला जाईल.- डॉ. चंद्रकांत म्हस्के, अधिष्ठाताराजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय