जालना : परतूर, मंठा व जालना तालुक्यातील समाविष्ट असलेल्या २०८ गावांसाठी निम्नदुधना प्रकल्प येथून ग्रीड पद्धतीची कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र या योजनेसाठी आठ ग्रामपंचायतींनी अद्याप प्रस्ताव दाखल केलेले नाहीत. ज्या गावांचे प्रस्ताव नाहीत, ती गावे या योजनेतून वगळण्याचा इशारा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला आहे.पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, या ग्रीड पद्धतीच्या पाणीपुरवठा योजनेचे आराखडे अंतिम होण्याच्या दृष्टीने गावाचे ठराव होणे महत्वाचे आहेत. या तीनही तालुक्यातून २०० गावाच्या ग्रामपंचायतींने प्रस्ताव दाखल केले असून आठ ग्रामपंचायतींने अद्यापपर्यंत प्रस्ताव दाखल केलेले नाहीत. ज्या ग्रामपंचायतींचे प्रस्ताव दाखल केलेले नाहीत, ती गावे या योजनेतून वगळली जातील. त्यामुळे सर्व संबंधित गावांनी या योजनेत समाविष्ट होण्यासाठी आपला ठराव त्वरीत सादर करावा, असे आवाहन लोणीकर यांनी केले आहे.ग्रीड पद्धतीच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्याच्या योजनेमध्ये परतूर तालुक्यातील ७७ गावे, मंठा तालुक्यातील १०८ गावे व जालना तालुक्यातील २३ गावांचा समावेश आहे. या तीनही तालुक्यातील २०८ गावांची २०११ च्या जनगणनेनुसार दोन लाख ३० हजार १७३ एवढी लोकसंख्या आहे. या प्रस्तावित ग्रीड पद्धतीच्या पाणीपुरवठा योजनेत गावांचा, वाड्यांचा समावेश होण्यासाठी मंठा येथे सर्व सरपंच व ग्रामसेवकांची कार्यशाळा घेण्यात आली होती. ग्रामपंचायतींना ठराव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)२०८ पैकी २०० गावांचे ठराव प्राप्त झाले असून परतूर तालुक्यातील मापेगाव बुद्रुक, मंठा तालुक्यातील खोरवड, मोहदरी, पांगरी बुद्रूक, धोंडिपिंपळगाव, जालना तालुक्यातील सोमदेव, धारा, शिवनगर या आठ ग्रामपंचायतींनी त्यांचे ठराव अद्यापपर्यंत मंजुरीसाठी सादर केलेले नाहीत.
प्रस्ताव नसलेली गावे पाणीपुरवठा योजनेतून वगळणार - लोणीकर
By admin | Published: April 30, 2015 12:20 AM