भादवण येथे पहिल्या लाटेत अनेक रुग्ण बाधित झाले होते. दुसऱ्या लाटेतही रुग्ण वाढत असल्याने ग्रामपंचायत व कोरोना समिती यांनी कडक लॉकडाऊन संदर्भात ग्रामस्थांची मते जाणून घेतली. मात्र, ग्रामस्थांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लादावेत, अशी मागणी होत आहे.
उत्तूर हे बाजारपेठेचे मुख्य केंद्र आहे. २२ खेड्यातील ग्रामस्थ औषधोपचार दवाखाना, बाजारहाट, बँक आदी कामासाठी उत्तूरला येतात. त्यामुळे गर्दी होत असते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तूरला रुग्ण वाढत असल्याने ग्रामपंचायतींने कडक निर्बंध लादण्याचे ठरविले आहे. स्थानिकांत संसर्ग वाढल्याने धोका अधिक वाढला आहे.
महागोंड येथे कोरानाने एकाचा मृत्यू झाल्याने महागोंडकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दिवसागणिक रुग्ण वाढत असल्याने ग्रामस्थांनी नियमांचे पालन करुन स्थानिक संसर्ग रोखला पाहिजे असे ग्रामस्थांचे मत आहे.
उत्तूर परिसरातील जनतेच्या सेवेसाठी पुन्हा मुमेवाडी येथे कोविड सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने जागेची साफसफाई आपटे फौंडेशनतर्फे करण्यात आली आहे.
-------------------
* उत्तूरला आज बैठक
उत्तूर येथे स्थानिक संसर्ग वाढल्याने कुटुंब सर्व्हेक्षण करण्याच्या दृष्टीने अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग, सर्व शाळांचे शिक्षक यांची बैठक सरपंच वैशाली आपटे यांनी बोलावली आहे. उद्याच्या बैठकीत उत्तूर येथे कडक लॉकडाऊन होण्याच्या दृष्टीने निर्णय होण्याची शक्यता आहे.