गणेश शिंदे -- कोल्हापूर --सुजलाम्, सुफलाम् अशी राज्यात ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात उत्तर भारतातील पूर्वोत्तर राज्यांमधून येथे स्थायिक झालेल्यांची वीण दिवसेंदिवस आणखी घट्ट होत आहे. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांच्या सीमारेषेवर असलेल्या विविध धर्म, जातींतील सुमारे ४५ हजार बांधव कोल्हापूर जिल्ह्यात व्यवसायानिमित्त वास्तव्यास असल्याचे दिसते. सुतारकाम, ट्रान्स्पोर्ट, फौंड्री हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. या सर्व जातिधर्मांना एकत्र आणण्याचे काम राजर्षी शाहू पूर्वाेत्तर भारतीय संघाने केले आहे.कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ३८ लाख, तर शहराची लोकसंख्या सुमारे सात लाख आहे. २५ वर्षांपूर्वी कोल्हापुरात बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांतील विशेषत: आझमगड, गोरखपूर, बलिमा, छापरा, दरभंगा (बिहार) याबरोबरच ओडिशा, पश्चिम बंगालच्या सीमारेषेवरील सर्व जातिधर्मांचे पूर्वाेत्तर भारतीय लोक व्यवसायनिमित्त येथे स्थायिक झाले. विशेषत: गांधीनगर (ता. करवीर), इचलकरंजी या भागांत पूर्वोत्तर भारतीयांची लोकसंख्या सुमारे ३० ते ३५ हजार आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात १२०० ते १५००, तर दक्षिणमध्ये तीन ते साडेतीन हजार आहे. या समुदायांना एकत्र आणण्याचे काम दहा वर्षांपूर्वी सुरू झाले. राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघ कोल्हापुरात स्थापन झाला. तसेच शहरात राजारामपुरी, नेर्ली-तामगाव, शिरोली, आदी भागांत त्यांचे वास्तव्य आहे. नोव्हेंबर महिन्यात इचलकरंजी, नेर्ली-तामगाव व कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटावर हे सर्व बांधव ‘छटपूजा’ करतात. सूर्याची पूजा करून ते हा सोहळा साजरा करतात. त्याचबरोबर टेंबलाईवाडी येथे संघामार्फत धुलिवंदन व सर्वांचा स्नेहमेळावा घेतला जातो. शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमध्ये फौंड्री क्लस्टर, ट्रान्स्पोर्ट, आदी व्यावसायिक आहेत. कोल्हापुरात टाकाळा येथील रामजी संकुल येथील अपार्टमेंटमध्ये राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघाचे कार्यालय आहे. तिथे महिन्यातून एकदा चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविली जाते. त्या पद्धतीने विधायक काम करून या संघाने कोल्हापुरात ठसा उमटविला आहे.उद्या छटपूजाप्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी उद्या, मंगळवारी छटपूजा होणार आहे. तिच्या नियोजनासाठी दीपावलीनंतर राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघाची बैठक झाली. या बैठकीत याचे नियोजन करण्यात आले. दरम्यान, इचलकरंजी येथे हा समाज मोठ्या प्रमाणात असल्याने येथे छटपूजा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.अनमोल रत्ने...उत्तर भारतातील मूळ बिहार येथील विकास नरेंद्र झा (रा. दरभंगा, जि. दरभंगा) हे कोल्हापुरात स्थायिक झाले असून, ते २०१२ मध्ये आय.आय.टी.मध्ये १७३ रँकमध्ये आले. ते सध्या मुंबईत एम.टेक. करतात. २०१२ मध्ये निशा नरेंद्र झा यांनी जे.ई.ई.ई. परीक्षेत प्रावीण्य मिळविले आहे. डॉ. ऋचा त्रिपाठी व सुप्रिया संजय सिंह एम.बी.ए. असून, सध्या पुणे येथे एका कंपनीत त्या नोकरीस आहेत. कोल्हापुरात अॅड. रामप्रवेश टी. रॉय, अॅड. रिचा लॉँचिंग (दोघेही उत्तर प्रदेश) वकील म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर आयकर विभाग, भविष्यनिर्वाह निधी कार्यालय अशा केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांत उत्तर भारतातील लोक अधिकारी आहेत.सामाजिक बांधीलकी...छटपूजेबरोबर हे सर्व बांधव गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. ते सामाजिक कार्यात भाग घेतात. जे गरजू आहेत त्यांना संघामार्फत मदतीचा हात दिला जातो. सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम संघ करीत आहे.
पूर्वोत्तर भारतीयांची कोल्हापूरशी नाळ घट्ट
By admin | Published: November 16, 2015 12:18 AM