कोल्हापूर : प्रचंड प्रमाणात महागाई वाढली असताना भाजपच्या मंत्र्यांची महाराष्ट्रातील जन आशीर्वाद यात्रा ही शिव्याशाप यात्रा आहे अशी बोचरी टीका जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या पाटील यांनी भाजपचा समाचार घेतला.
पाटील म्हणाले, पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत. जनता यामुळे हैराण झालेली असताना भाजपची महाराष्ट्रातून जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. बिचारे गावागावातून फिरत आहेत; परंतु महागाईमुळे हैराण झालेल्या जनतेचे शिव्याशापच त्यांना मिळत आहेत. कल्याणसिंग यांच्या पार्थिवावर ठेवलेल्या तिरंग्यावर भाजपचा तिरंगा पांघरल्यामुळे राष्ट्राला प्राधान्य देणाऱ्या नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. नागरिक हे सहन करणार नाहीत. भाजपला देशापेक्षा पक्ष मोठा वाटतो हेच यातून दिसले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी ‘न कळणाऱ्यांना दिलं; परंतु कळणाऱ्यांना द्यायला वेळ का लागतोय’ अशी विचारणा केली असता यावर आपल्याला बोलण्याची आवश्यकता वाटत नसल्याचे सांगितले, तसेच शेट्टी यांच्या सांगलीतील पत्रकार परिषदेला भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते याबाबत विचारल्यानंतर मात्र पाटील यांची कोंडी झाली. शेट्टी हे महाविकास आघाडीचे घटक असताना असे कसे असे विचारल्यानंतर, बघू, असे सांगत प्रतिक्रिया देणे टाळले. शेट्टी यांच्या मागण्यांचा तपशील माझ्याकडे आला नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
न्यायालयीन याचिकांमुळे काही निर्णय बाकी आहेत. म्हणूनच शिवस्मारकाचे काम थांबले आहे. आमच्या सरकारची ते पूर्ण करण्याची इच्छा आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.