कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा शोध सुरू आहे; परंतु आजअखेर याप्रकरणी पोलिसांना कोणताही ठोस सुगावा हाती लागलेला नाही, अशी कबुली राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. आमचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. आम्ही नक्कीच हल्लेखोरांपर्यंत पोहोचू, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमाताई यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यास सतरा दिवस झाले; परंतु पोलिसांना याप्रकरणी कोणतीच ठोस माहिती लागलेली नाही. या प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी महासंचालक दयाळ मंगळवारी सायंकाळी कोल्हापुरात आले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बुधवारी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयात त्यांनी दोन तासांहून अधिक काळ तपासकामासाठी नियुक्त केलेल्या पथकांच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेतली व त्यानंतर यासंबंधीची माहिती पत्रकारांना दिली. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, तपास अधिकारी अंकित गोयल व एम. एम. मकानदार, आदी उपस्थित होते.दयाळ म्हणाले, ‘कोणत्याही घटनेत तपासाच्या दृष्टीने प्रत्यक्षदर्शी पुरावा हा सगळ््यात महत्त्वाचा दुवा असतो. पानसरे हल्ला प्रकरणात आम्ही त्यासाठी जिथे हल्ला झाला त्या परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांकडून काहीतरी माहिती मिळविण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु त्यांच्याकडून काहीच माहिती दिली जात नाही. ती का दिली जात नाही याचीही काही कारणे असू शकतील; परंतु ते लोक पोलिसांना माहिती देण्यास पुढे येण्यास तयार नाहीत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्यावर हल्ला झाला त्या पानसरे यांचा जबाबही आमच्यादृष्टीने महत्त्वाचा होता. परंतु, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांची जबाब घेण्यासारखी स्थिती नव्हती, नंतरही हा जबाब घेता आला नाही. हल्ला झाला तेव्हा त्यांच्यासोबत उमा पानसरे होत्या; परंतु त्यांना रुग्णालयातून कालच घरी जाऊ देण्यात आले आहे. त्यांच्याकडूनही हल्लेखोरासंदर्भात फारशी माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यांचा अद्याप पुरेसा जबाबही घेता न आल्याने हल्लेखोरांसदर्भात एखादाही महत्त्वाचा सुगावा लागलेला नाही.’ याचा अर्थ आतापर्यंत तपासांत काहीच हाती लागलेले नाही, असे समजायचे का, अशी विचारणा पत्रकारांनी केल्यावर महासंचालक दयाल म्हणाले, ‘आमचा तपास योग्य व ‘करेक्ट’ दिशेने सुरू आहे आणि आम्ही काही दिवसांत या प्रकरणाचा नक्कीच छडा लावू.’ सनातनी प्रवृत्तींबाबत...पानसरे यांच्यावरील हल्ला हा अन्य कोणत्याही कारणांपेक्षा तो सनातनी प्रवृत्तींकडूनच झाला असण्याची शक्यता त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त झाली आहे. त्याची पोलिसांनी काही दखल घेतली आहे का, असे विचारल्यावर दयाळ म्हणाले, ‘या हल्ल्याचा आम्ही सर्व अंगांनी तपास करीत आहोत. हल्ल्याचा कोणताही उद्देश (मोटिव्हेशन)आम्ही बेदखल केलेला नाही.’)महासंचालक का आले..?पानसरे यांच्यावरील हल्ल्यास तब्बल सोळा दिवस झाले तरी तपासात कोणतीच प्रगती नसल्याबध्दल मंगळवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. येत्या सोमवारपासून (दि.९) अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. ११ मार्चला मुंबईत डाव्या पुरोगामी पक्षातर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी होणार असल्याने स्वत: पोलिस महासंचालक संजीव दयाल हेच घाईघाईने कोल्हापूरला आले.‘सीबीआय’ला तयारया हल्ल्याप्रकरणी तपासासाठी आम्ही आतापर्यंत २५ पथके स्थापन केली आहेत. पुणे व कोकण विभागातील अधिकाऱ्यांचीही मदत तर घेतली आहेच शिवाय परराज्यांतील पोलिसांचीही मदत आम्ही घेत आहोत. त्यामुळे खास तपास पथके(एसआयटी)आताही अस्तित्वात आहेत. याप्रकरणी कुणी सीबीआय चौकशीची मागणी केल्यास त्यासही आमचा विरोध नाही. कारण आम्हाला कोणतीच माहिती लपवायची नाही; परंतु यापूर्वीच्या दोन खूनप्रकरणात सीबीआय चौकशीचे पुढे काय झाले, हे आपल्या सगळ््यांना ज्ञात आहेच.
ठोस सुगावा नाही; तपास योग्य दिशेने
By admin | Published: March 05, 2015 12:48 AM