समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘आगामी काळात कोणतीही निवडणूक लढविणार नाही’ असे म्हणणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १२ तासांत आपला ‘शब्द’ फिरविला. ‘निवडणूक लढवणार नाही, याचा अर्थ राजकीय संन्यास घेणार असा होत नाही,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.राज्यातील दुसºया क्रमांकाचे नेते आणि भाजपमधील बडे प्रस्थ असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी कोल्हापुरातील पोलीस दलाच्या गणराया अवॉर्ड वितरणावेळी बोलताना आपण आगामी विधानसभा, लोकसभाच काय विधान परिषदेची निवडणूकही लढविणार नाही, असे वक्तव्य केले होते. मंत्री चंद्रकांत पाटील हे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी असलेली जवळीक सर्वांनाच माहीत आहे.गेल्यावर्षी गणेशोत्सवात साऊंड सिस्टीम लावण्याला मंत्री पाटील यांनी विरोध केला होता, तर शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी गणेश मंडळांच्या बाजूने भूमिका घेतली होती. ‘माझ्या अशा भूमिका राजकीय हेतूंनी कधीच नसतात,’ असे सांगताना मंत्री पाटील यांनी ‘राजेश क्षीरसागर यांना निवडणूक लढवायची आहे. मला तीही लढवायची नाही. एवढेच नव्हेतर ‘इथे पत्रकारही आहेत, त्यांनी हे छापून टाकावं,’ असे म्हटले. मात्र, आपण भावनेच्या भरात जे बोललो ते गांभीर्याने घेतले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी राजकीय संन्यास घेणार नसल्याचे स्पष्ट करून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
निवडणूक न लढविणे म्हणजे राजकीय संन्यास नव्हे : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 12:40 AM