कोल्हापूर : कानठळ्या बसविणाऱ्या डॉल्बीचा नव्हे, तर कोल्हापुरात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत विवेकाचाच आवाज बुलंद असल्याचे प्रत्यंतर शुक्रवारी आले. चार-दोन मंडळांच्या हट्टामुळे रात्री डॉल्बीचा आवाज चढू लागला होता; परंतु पोलिसांनी त्यावर कारवाई केल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त झाला. निर्माल्यदान व मूर्तिदानास मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादानंतर कोल्हापूरने ध्वनिप्रदूषण रोखण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.पारंपरिक वाद्यांचा गजर आणि ‘सैराट’मधील गाण्यांवर थिरकलेली तरुणाई आणि नेत्रदीपक रोषणाई ही यंदाच्या मिरवणुकीची वैशिष्ट्ये ठरली. पावसानेही उसंत दिल्याने लोकांच्या उत्साहात भर पडली. तब्बल २८ तास ही मिरवणूक झाली व त्यामध्ये कोल्हापूर शहरात ९३७, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३३५३ मूर्तीचे विसर्जन झाले. किरकोळ वादावादी, लाठीमाराचे प्रकार वगळता १० दिवसांचा महाउत्सव प्रचंड आनंदात व कोणतेही गालबोट न लागता शांततेत, उत्साहात पार पडला.गतवर्षीच्या उत्सवात डॉल्बीच्या आवाजाने लोकांचे कान फाटले होते. मागील दोन वर्षांत विधानसभा व महापालिका निवडणुकांमुळे पोलिस प्रशासनाने कारवाईचा बडगा झाकून ठेवला होता. त्यामुळे दणदणाटातच मिरवणूक झाली होती; परंतु यंदा गेली महिनाभर ‘लोकमत’सह सर्वच प्रसारमाध्यमे व जिल्हा प्रशासनानेही डॉल्बीमुक्त मिरवणुकीचा आग्रह धरला होता. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही प्रशासनास त्यासाठी बळ दिले होते. त्यामुळे यंदाच्या मिरवणुकीत धनगरी ढोल, झांजपथके, लेझीम पथके, ढोल-ताशे, आदी वाद्यांचा वापर जास्त झाला. मिरवणुकीत सहभागी झालेले तांत्रिक देखावेदेखील वैशिष्ट्यपूर्ण राहिले. डॉल्बीला फाटा देत काही मंडळांनी अत्यंत नेत्रदीपक विद्युत रोषणाईमुळे तिच्या प्रकाशाने मिरवणुकीचा मार्ग रात्रीतही उजळून निघाला. मिरवणूक शांततेत झाली, तरी ती बेशिस्त आणि फारच धिम्या गतीने झाली; कारण मंडळांना पुढे चला म्हटले की त्यांचा अहंकार दुखावतो व त्यातून वादाला सुरुवात होते. त्यामुळे मिरवणुकीत सर्वत्र पोलिस थांबून होते; परंतु कुणालाही ते ‘पुढे चला’ म्हणत नव्हते. मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये एवढी दक्षता पोलिसांनी घेतली. विसर्जन मिरवणुकीचे उद्घाटन गुरूवारी सकाळी सव्वाआठ वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महापौर अश्विनी रामाणे, आर. के. पोवार, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत झाले. पालखीतून मिरवणुकीत सहभागी होण्याची परंपरा असणाऱ्या, मंगळवार पेठेतील तुकाराम माळी तालीम मंडळाची मूर्ती पहिल्यांदा मिरवणुकीत सहभागी झाली. रुईकर कॉलनीतील क्रांती युवक मित्र मंडळाच्या शेवटच्या मूर्तीचे विसर्जन शुक्रवारी सकाळी ११.४५ वाजता पंचगंगा नदीत झाले. आमदार सतेज पाटील व पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पोलिसांसमवेत नृत्य करून हा आनंद साजरा केला. (प्रतिनिधी)कोल्हापूरच्या डॉल्बीमुक्तीचा देशात गौरव यंदाच्या गणेशोत्सवात सर्व गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले, गेल्या दहा दिवसांपासून शांततेत तसेच डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा केला. हीच परंपरा विसर्जन मिरवणुकीतही जोपासून प्रशासनास सहकार्य करावे. डॉल्बीमुक्तीमुळे कोल्हापूरचे नाव देशात गौरविले जात आहे. ही कोल्हापूरकरांची किमया यापुढेही वृद्धिंगत व्हावी. गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी प्रशासनास केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.विसर्जन मिरवणुकीत तरुण मुली व महिलांचा सहभाग सक्रिय राहिला. चिमुकल्या मुलांना कवेत घेऊन महिला मध्यरात्रीपर्यंत मिरवणूक पाहत होत्या. अनेक मंडळांच्या स्वयंसेवक म्हणून मुली होत्याच; परंतु मिरवणुकीत बेभान होऊन नाचणाऱ्या मुलीही यावेळी जास्त होत्या. मिरवणुकीत एवढ्या गर्दीत जाऊन बघण्यासारखे काय असते, असे कुणालाही वाटते. त्यामागे काय मानसिकता असते हे येथील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पी. एम. चौगले यांना ‘लोकमत’ने विचारले. ते म्हणाले, ‘मुली व महिलांनी रात्रीचे रस्त्यांवर बाहेर पडणे या बदलाकडे मी सकारात्मकपणे पाहतो. हे फक्त मिरवणुकीपुरतेच झालेले नाही. मुली-महिला आता नोकरीसाठी पुढे आहेत. धार्मिक कार्यातही त्या पुढाकार घेत आहेत. वर्किंग क्लास वाढला, तशा त्यांच्या जगण्याच्या कक्षाही रुंदावल्या. पूर्वी गौरी-गणपतीच्या सणांत त्यांना व्यक्त होता येत होते. लोकनृत्यांत त्या भाग घेत असत. त्यातून त्यांचा शारीरिक व्यायामही होत असे व त्यांना आनंदही मिळत असे. हे कालानुरूप कमी होत गेल्याने त्यांनी नव्या जागा शोधल्या. त्यात मिरवणूक पाहण्याचा आनंद मिळत असल्याने महिलांची गर्दी होत आहे.फॅड कोल्हापुरातच...डॉल्बीचे फॅड फक्त कोल्हापूर शहरातच जास्त आहे. वर्षभर जी खिजगणतीतही नसतात, अशी गल्लीबोळातील मंडळे मिरवणुकीत मात्र डॉल्बीच्या भिंती कशा उभारतात, यामागील अर्थकारणही अचंबित करणारे आहे. साताऱ्यात डॉल्बीमुक्त मिरवणूक निघाली. सांगलीत तर डॉल्बीमुक्त मिरवणूक काढून त्यातील दहा लाख रुपये मंडळांनी जलयुक्त शिवारसाठी दिले. पुण्यात मात्र काही प्रमाणात दणदणाट झाला. कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पारंपरिक वाद्यांचाच गजर होतो आणि नेहमीच नवे पायंडे पडणारे कोल्हापूर मात्र डॉल्बीच्या आवाजात बधीर होते, असे दुर्दैवी चित्र दिसते.
डॉल्बीचा नव्हे, विवेकाचाच आवाज बुलंद
By admin | Published: September 17, 2016 12:16 AM