लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर जिलेटिनच्या कांड्या सापडणे यामागे कोणताही घातपात नसून, सहानुभूती मिळविण्याचा अंबानी यांचाच प्रयत्न असल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. तीन कृषी कायद्यांमुळे देशभरातील सामान्य जनतेत अंबानी व अदानी यांच्याविरोधात जो रोष तयार झाला आहे, त्यातून डॅमेज झालेली प्रतिमा सुधारली जावी, यासाठीच हा आटापिटा असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, या प्रकरणातील साऱ्याच घटना संशयास्पद आहेत. गाडी चोरीची आहे. तिथे गाडी लावून जिलेटिनच्या कांड्या ठेवेपर्यंत कुणालाच कसे माहीत झाले नाही, हे गौडबंगाल आहे. पोलीस यंत्रणेचेही हे अपयश म्हणायला हवे. काहीतरी स्टंट करून देशाची सहानुभूती कशी मिळवता येईल, असा प्रयत्न असल्याचे माझे मत आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांचे अंबानी व अदानी हेच सर्वाधिक लाभार्थी आहेत. या आंदोलनात आतापर्यंत कित्येक शेतकऱ्यांनी बलिदान दिले. गेले चार महिने हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे देशभरातील जनतेत या उद्योजकांबद्दल तीव्र संतापाची भावना आहे. ती कमी करण्यासाठी असे काही तरी घडवून आणावे लागते. महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य उजेडात आणावे. अंबानी यांचे पाठीराखे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून या प्रकरणाचा छडा लावावा, म्हणजे नेमके सत्य जनतेसमोर येईल.