कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलात ५० टक्के सवलत देण्याचा महावितरणचा प्रस्ताव असताना राज्य सरकार त्यावर विचार करीत नाही. हे सरकार नेमके कोण चालवते? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला असून, मुख्यमंत्री हे ठाकरे नव्हे तर अजित पवारच असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सम्राट शिंदे व सोमनाथ साळुंखे यांच्या प्रचारासाठी आंबेडकर मंगळवारी कोल्हापुरात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपच्या काळात महावितरणची थकबाकी वाढली, याबाबत दुमत नाही. मात्र या सरकारने काय केले? लॉकडाऊनच्या काळातील बिलांबाबत प्रत्येकजण वेगळेच बोलत आहे. जनतेमध्ये संभ्रम आहे. येथे शासन हे मुख्यमंत्री दिसत नाहीत तर मंत्री हेच शासन झाले आहेत.
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली. आंदोलनकर्त्यांना तोंड देता येत नाही, म्हटल्यावर १६ टक्के आरक्षणातून शिष्यवृत्ती व फी सवलतीची घोषणा केली. ही सवलत या वर्षीच्या विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. मराठा समाजाची अवस्था फारच बिकट आहे, श्रीमंत मराठा सामान्य मराठ्याला जगू देणार नाहीत, याची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. याप्रसंगी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, डॉ. आनंद गुरव, दिलीप हिरवे, अस्मिता दिघे, सचिन कांबळे, आदी उपस्थित होते.