लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी काही चित्ते आफ्रिकेतून आणून मध्यप्रदेशमधील जंगलात सोडण्यात आले. परंतु कोल्हापूरला चित्ते नवीन नाहीत. शाहू महाराज आणि राजाराम महाराजांनीही अनेक चित्ते बाळगले होतेे आणि त्याची संख्या २२ होती. त्याची छायाचित्रे आजही उपलब्ध आहेत. काय त्या इम्पोर्टेड चित्त्यांचं घेऊन बसलाय, आमच्या कोल्हापुरात तर चित्त्यांची शाळाच भरायची हा इतिहास आहे कोल्हापूरचा.. म्हणून ही माहिती सोशल मीडियावर सोमवारी जोरदार व्हायरल झाली.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सांगतात, राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये चित्त्याकडून हरणांची शिकार करून घेण्याचा एक खेळ जो प्राचीन काळापासून होता तो पुनरुज्जीवित केला होता. करवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी सातारकर छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून एक चित्ता मागून घेतल्याचे पत्रही उपलब्ध आहे. या शिकारीच्या खेळामध्ये प्रशिक्षित चित्त्याकडून गवताळ रानात असणाऱ्या हरणांच्या कळपातून नेमक्या मोठ्या काळवीटाची शिकार करण्याची कला या चित्त्यांना शिकवली जात असे.
या चित्त्यांना सांभाळण्यासाठी काही व्यक्तींनाही प्रशिक्षित केले गेले होते. या व्यक्तींना चित्तेवान असे म्हणत. हे चित्तेवान निडर आणि चित्ते प्रशिक्षित करण्यामध्ये, त्यांची देखभाल करण्यामध्ये निष्णात होते. शाहू महाराजांनी तयार केलेल्या चित्तेवानांची फळी ही तत्कालीन भारतामध्ये नावाजली गेली होती. शाहू काळामध्ये आणि त्यानंतर शाहूपुत्र राजाराम महाराजांच्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये हा चित्ताहंट खेळ खूपच प्रसिद्ध झाला होता.
कोल्हापूरमधल्या चित्त्यांची संख्या मोठी असायची. परंतु मिळालेल्या एका छायाचित्रात २२ चित्ते असल्याचे दिसून येते. राजाराम महाराजांच्या काळातही आफ्रिकेमधून चित्ते मागवल्याचे काही संदर्भही उपलब्ध आहेत. करवीर छत्रपती घराण्यामध्ये शालिनी नावाचा एक चित्ता खूपच प्रसिद्ध झाला होता. त्याचबरोबर राजाराम महाराज चित्ताहंटसाठी तयार केलेल्या ब्रिक स्वतः हाकत आहेत आणि या ब्रिकवर पाठीमागे चित्त्याला चित्तेवान घेऊन बसलेले आहेत. विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट ही की कलामहर्षी बाबूराव पेंटर आणि चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी आपल्या चित्रपटांमध्ये छत्रपतींकडील या चित्त्यांचा चित्रीकरणासाठी उपयोग करून घेतला होता.