लोकमत न्यूज नेटवर्करुकडी/माणगाव : आता दोघांनीही रिटायरमेंट घेऊन इतरांना संधी देऊया. राजकारणाची खुमखुमीच असेल तर दोन जिल्हे सोडून तिसºया जिल्ह्यात जाऊन समोरासमोर लढूया, मग बघू कोणाची ताकद किती आहे ते, असे आव्हान कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता दिले. तसेच काढलेली आत्मक्लेश नव्हे, तर सदाभाऊ क्लेश यात्रा होती, असा टोलाही लगावला. रुकडी (ता. हातकणंगले) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडची प्रतिकृती मेघडंबरीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार निवेदिता माने होत्या.मंत्री खोत म्हणाले, राजकारणात नव्हतो ते बरे होतो; पण राजकारणात आल्यावर कळलं की घरातल्यांच्या पण पोटात दुखायला लागलं आहे. काल नुसतं जरा बोट लावलं तर त्यांना गुदगुल्या सुरू झाल्यात. कर्जमाफीचं आंदोलन खरंतर पुणतांब्याच्या सर्वसामान्य शेतकºयांनी उभं केलं आणि यांनी श्रेय घेण्यासाठी आत्मक्लेश यात्रा काढली. सरकारने साडेनऊ रिकव्हरीला २५५०, तर बारा रिकव्हरीला ३१०० रु. एफआरपी जाहीर केला आहे. एफआरपी वाढणार हे माहीत असतं तर त्यांनीही दोन दिवसांचे उपोषण केले असते. दोनशे मैलांवर जाऊन ४ लाख ८० हजार मते घेतली आणि हे म्हणतात यांच्या मागे कोण आहे. त्यांनी नेहमीच सोयीचे राजकारण केले आहे. आपलं जमलं की ओके; असा त्यांचा रीतिरिवाज आहे. मला आता काहीच नको आहे, मी पूर्ण समाधानी आहे. आता एकच काम आहे ......ओके, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.खासदार संभाजीराजे म्हणाले, देशात ३५० किल्ले आहेत. त्यांच्या संवर्धनासाठीच माझी खासदारकी पणाला लावेन. रुकडी ही ऐतिहासिक नगरी असल्याने त्याचे जतन करण्यासाठी लागेल तेवढा निधी देण्यात कमी पडणार नाही. यावेळी माजी खासदार निवेदिता माने, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार उल्हासदादा पाटील, माजी आमदार राजीव आवळे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, प्रा. शहाजी कांबळे, ठेकेदार रफीक कलावंत, अमोलदत्त कुलकर्णी, आदींनी मनोगत व्यक्त केले. मिलिंद ढवळे-पाटील यांनी स्वागत केले. माजी जि. प. उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी प्रास्ताविक केले. ताज मुल्लाणी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी महापौर हसिना फरास, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, जि. प. सदस्य प्रसाद खोबरे, राजवर्धन निंबाळकर, सुरेशदादा पाटील, विकास माने, आदिल फरास, सरपंच मीनाक्षी अपराध, बबलू मकानदार, असलम फकीर, मोहन माने, नंदकुमार शिंगे, आदी उपस्थित होते.भाजप प्रवेशाची नांदीआजचा कार्यक्रम तसा सामाजिक होता, पण राजकीय उपस्थिती पाहता व टोलेबाजीमुळे माने गटाची ही भाजप प्रवेशाची नांदी आहे, अशी उपस्थितांत चर्चा होती.
आत्मक्लेश नव्हे, सदाभाऊ क्लेश यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:58 AM