कुरुंदवाड : शहरातील ३६ धोकादायक इमारत मालकांना पालिका प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. धोकादायक इमारत संबंधितांनी दुरुस्त अथवा उतरून घ्याव्यात. अन्यथा होणाऱ्या नुकसानीला पालिका प्रशासन जबाबदार असणार नाही, अशी नोटीस संबंधितांना बजावण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अंतिम घटका मोजणाऱ्या अनेक इमारती शहरात आहेत. पालिका प्रशासन प्रत्येक वर्षी नोटिसा बजावते. मात्र, याची दखल इमारत मालक घेताना दिसत नाहीत.
या शहरावर संस्थांनिकांचे वर्चस्व असल्याने शंभर वर्षांपर्यंतच्या, तसेच कच्च्या मातीत बांधलेल्या अनेक वास्तू, इमारती आहेत. काहींनी त्याची डागडुजी करून वास्तू सुरक्षित करून जुन्या इमारती जपल्या आहेत, तर अनेकांनी या इमारतीकडे दुर्लक्ष करून वास्तव्यासाठी दुसरीकडे इमारत बांधली आहे. स्वत: सुरक्षित असले तरी शेजारी अथवा येणारे-जाणारे अशा धोकादायक इमारतीमुळे कदाचित बळी ठरू शकतात.
पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे करून शहरातील ३६ इमारती धोकादायक असल्याने इमारत मालकांना नोटिसा बजावल्या आहेत.
धोकादायक इमारती दुरुस्त अथवा उतरून घ्याव्यात, अन्यथा होणाऱ्या नुकसानीला पालिका प्रशासन जबाबदार नाही, अशी नोटीस बजावून पालिका प्रशासनाने कायद्याच्या चौकटीतून जबाबदारी झटकली आहे. मात्र, दुर्घटना घडल्यास त्यातून आर्थिक अथवा जीवित हानी झाल्यास एकमेकांवर जबाबदारी झटकण्यापेक्षा पालिका प्रशासनाने कारवाईबाबत कडक भूमिका घ्यावी, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.
-------------------
कोट -
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील ३६ धोकादायक इमारती मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. अद्यापही सर्व्हे सुरू असून, उर्वरित धोकादायक इमारती शोधून नोटिसा काढण्यात येणार आहेत.
- निखिल जाधव, मुख्याधिकारी कुरुंदवाड, नगर परिषद