कोल्हापूर : भुदरगड पंचायत समितीचे प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी मोरे यांना आज, शुक्रवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. पंचायत समितीच्या मिटिंगला सहा महिने गैरहजर राहिल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उमेश आपटे यांनी त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. मोरे हे कागल पंचायत समितीकडे बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर भुदरगड पंचायत समितीचा अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे. पण ते भुदरगड पंचायत समितीच्या गेल्या सहा महिन्यातील एकाही सभेला हजर राहिलेले नाहीत. त्यांच्या विभागाचे प्रोसिडींग बांधलेले नाही, अशा अनेक तक्रारी त्यांच्याबद्दल असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची सूचना अध्यक्ष आपटे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला, बालकल्याण) यांना केली. त्यानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांनी आज त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. याबाबत खुलासा करण्याचे आदेशही पाटील यांनी मोरे यांना दिले आहेत. त्याचबरोबर हातकणंगले, गडहिंग्लज व कागल तालुक्यांतील सायकल वाटपामध्ये चुकीच्या अंतराचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. सायकल वाटपामध्ये किलोमीटरचे अंतर आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात शाळा व गाव हेच अंतर दाखवलेले आहे. वास्तविक विद्यार्थ्यांचे घर व शाळेचे अंतर हा निकष लावणे गरजेचे असल्याचे अध्यक्ष उमेश आपटे यांचे म्हणणे आहे. त्यानुसार सर्व्हे करण्याचे आदेश अध्यक्ष आपटे यांनी संबंधित मुख्याध्यापकांना दिले असून, दुचाकीवरून जाऊन प्रत्यक्ष अंतर मोजण्याच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत. तो अहवाल पाहून संबंधित दोषी गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे अध्यक्ष आपटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
भुदरगडच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना नोटीस
By admin | Published: June 21, 2014 12:41 AM