कोल्हापूर : सीपीआरमध्ये एका रुग्णाला मुदतबाह्य इंजेक्शन दिल्याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. या वॉर्डमधील ब्रदर आणि इन्चार्ज सिस्टर या दोघांना नाेटिसा काढण्यात आल्या आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी ही माहिती दिली.
पेठवडगाव येथील महादेव खंदारे यांना शुक्रवारी सकाळी डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपलेले इंजेक्शन देण्यात आले. ही बाब लक्षात येताच याबाबत तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेत तातडीने शनिवारी या वॉर्डमध्ये त्यावेळी कामावर असलेले ब्रदर आणि इन्चार्ज सिस्टर या दोघांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. त्यांचे म्हणणे आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
डॉ. मोरे म्हणाले, तीन आठवड्यापूर्वीच मुदतबाह्य झालेली सर्व औषधे, इंजेक्शन्स, सलाइन परत मागवून घेण्यात आली होती. मात्र, हे इंजेक्शन कसे राहिले, याचीही माहिती घेतली जात आहे.