कोल्हापूर : महापालिका आणि ठेकेदार यांच्यात झालेल्या कराराप्रमाणे दोषदायित्व कालावधीत खराब झालेले शहरातील एकोणीस रस्ते तातडीने दुरुस्त करुन घेण्याचा प्रशासन प्रयत्न करत असून सर्व संबंधित ठेकेदारांना नोटीस काढण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी सोमवारी सर्व पक्षीय नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
गेल्या आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शहरातील सर्वच रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. खराब झालेल्या रस्त्यांमध्ये तीन वर्षाच्या आतच खराब झालेल्या १९ रस्त्यांचाही समावेश आहे. नवीन तयार केलेले रस्ते तीन वर्षाच्या आत खराब झाले तर त्याची दुरुस्ती करुन देण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते. हाच मुद्दा घेऊन सर्व पक्षीय नागरी कृती समितीचे सदस्य सोमवारी महापालिकेत अधिकाऱ्यांना भेटायला गेले होते. यावेळी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उप शहर अभियंता रमेश मस्कर,आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, रावसाहेब चव्हाण उपस्थित होते.
दोषदायित्व कालावधीतील किती रस्ते खराब झाले आणि ते दुरुस्त करुन घेण्याकरीता प्रशासकीय पातळीवर कशा प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत, अशी विचारणा कृती समितीचे अशोक पोवार व रमेश मोरे यांनी केली. त्यावेळी शहर अभियंता सरनोबत यांनी शहरातील १९ रस्ते खराब झाले आहेत. संबंधित ठेकेदारांना नोटीस काढण्यात आली असून तातडीने हे रस्ते दुरुस्त करुन घेतले जातील. जर त्यांना टाळाटाळ केली तर त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव तयार केला जाईल.
बैठकीच्या सुरवातीला चारही शहर उपअभियंता यांनी त्यांच्या भागातील रस्त्याची माहिती आणि त्यांच्याकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती सांगितली.यावेळी दोषदायित्व कालावधीत रस्ते खराब झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांवर आधीच का कारवाई केली नाही, ठेकेदारांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न का केला जातो, अशी विचारणा यावेळी करण्यात आली. मात्र कारवाईपेक्षा त्यांच्याकडून रस्ते पुन्हा करुन घेणे महत्वाचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीत कृती समितीच्या सदस्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून आले.
महासभेसारखे प्रश्न विचारले जात होते. त्यामुळे बैठकीत अनावश्यक चर्चाही बरीच झाली. शिष्टमंडळात कृती समितीचे पोवार, मोरे यांच्यासह दिलीप पवार, गणी आजरेकर, पंडीतराव सडोलीकर, अजय कोराणे, लालासाहेब गायकवाड, किशोर घाटगे, अनिल कदम, रणजित आयरेकर, पांडुरंग आडसुळे, दिपक घोडके, महादेव पाटील, कादर मलबारी उपस्थित होते.