लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीचा प्रचार वेग घेत असतानाच यामध्ये संघाचे कर्मचारी सहभागी असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सहायक निबंधक (दुग्ध) डॉ. गजेंद्र देशमुख यांनी ‘गोकुळ’ला दिले आहेत.
‘गोकुळ’च्या राजकारणात ठरावधारकांबरोबरच संघाच्या कर्मचाऱ्यांची भूमिकाही महत्त्वाची असते. विशेष म्हणजे ‘गोकुळ’च्या सुपरवायझर यांचे महत्त्व अधिक असते. सुपरवायझर यांचा थेट दूध संस्थेशी संपर्क येतो. त्यामुळे निवडणुकीसाठी ठराव करण्यापासून मतदानापर्यंत बऱ्यापैकी यंत्रणा त्यांच्याच हातात असते. याबाबत यापूर्वीच निवडणूक यंत्रणेकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार २५ मार्च २०२१ राेजी कर्मचाऱ्यांना निवडणूक आचारसंहितेबाबत ‘गोकुळ’ प्रशासनास कळविले होते. मात्र, गेल्या महिन्याभरापासून संघाचे अनेक कर्मचारी थेट निवडणुकीच्या प्रचारात दिसत आहेत. त्याच्या तक्रारी निवडणूक यंत्रणेकडे आल्या असून, त्याची दखल घेऊन सहायक निबंधकांनी ‘गोकुळ’ प्रशासनाला नोटीस बजावली आहे. प्रचारातील कर्मचाऱ्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश कार्यकारी संचालकांना दिले आहेत.
ठरावधारक कर्मचारी येणार अडचणीत
‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी चारशेहून अधिक कर्मचारी ठरावधारक आहेत. त्यांच्यासह एकूणच कर्मचाऱ्यांवर निवडणूक यंत्रणेची नजर असल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहे.