शिक्षणाधिकारी उबाळे यांनी १६ मार्चपासून जिल्ह्यात विविध शाळांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे शिक्षकांच्या आग्रहाखातर सकाळच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळी सात ते दुपारी साडेअकरा अशी शाळेची वेळ आहे. मात्र, अनेक ठिकाणी यावेळेत शिक्षकच उपस्थित नसल्याचे उबाळे यांना पहावयास मिळाले. वास्तविक उबाळे या कोल्हापुरातून निघून त्या शाळेपर्यंत जाण्यासाठी आठ, साडेआठ वाजतात. तरीही अनेक शाळा उघडलेल्या नसणे, विद्यार्थ्यांनी शाळा उघडणे, विद्यार्थी दारात येऊन बसणे, असे प्रकार पहावयास मिळाले.
जिल्ह्यातील चंदगड, हातकणंगले, करवीर, राधानगरी, भुदरगड तालुक्यात आतापर्यंत त्यांचा दौरा झाला आहे. या सर्व शिक्षकांना गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून नोटीस काढून याबाबत खुलासा मागवण्यात आला आहे. एकीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी ही कडक भूमिका घेतली असताना ज्यांना नाेटीस काढली आहे, अशांनी पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून शिक्षकांच्या बाजूने आता काही सदस्य मध्यस्थीसाठी सरसावल्याचेही चित्र पहावयास मिळत आहे.
चौकट
चंदगडमध्ये चार दिवसांच्या सह्याच नाहीत
शिक्षणाधिकारी उबाळे ५ एप्रिल रोजी चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी अगदी दुर्गम भागातील वांदराई येथे त्या शाळेत पोहोचल्या तर शाळा बंद होती. काही वेळाने तेथे ग्रामस्थ जमा झाले. गुरुजींना आम्ही बघितले होते, असे त्यांनी सांगितले. थोड्या वेळाने एका मुलानेच घरातून शाळेची किल्ली आणली. शाळा उघडून तपासणी केली असता येथील दोन्ही शिक्षकांच्या हजेरीपत्रकावर चार, पाच दिवसांच्या सह्याच नसल्याचे निष्पन्न झाले. ही गैरहजेरी मांडून उबाळे तेथून बाहेर पडल्या.
चौकट
किडनीचा त्रास होता म्हणून
किडनीचा त्रास होता म्हणून आपण शाळेत गेलो नाही, असे चंदगड तालुक्यातील या शिक्षकाने आपल्या भागातील जिल्हा परिषद सदस्यांना सांगितले; परंतु पुढे काही कारवाई होऊ नये म्हणून हाच शिक्षक गुरुवारी पावणे दोनशे किलोमीटरचा प्रवास करून जिल्हा परिषदेत आला होता.
चौकट
शाहूवाडीतही हीच परिस्थिती
शाहूवाडी तालुक्यातील माळापुडे, कातळेवाडी या ठिकाणी गुरुवारी उबाळे यांनी शाळांना भेटी दिल्या, तेव्हा आठ वाजून गेले तरी येथील शाळा उघडल्या नसल्याचे दिसून आले.
चौकट
ग्रामस्थांची डबल ढोलकी
अनेक गावांतील ग्रामस्थ शाळेचा दर्जा चांगला नाही, शिक्षक वेळेत शाळेत येत नाहीत म्हणून तक्रारी करत असतात; परंतु आपल्या गावातील शाळा कधी उघडते, शिक्षक वेळेत येतात का, नीट शिकवतात का, आपलीच मुले तेथे शिकत असल्याने शिक्षकांच्याही काही अडचणी आहेत का, याची साधी चौकशीही करायला तयार नसतात. मात्र, दुसरीकडे चुकीची घटना घडली की, काहीवेळा शिक्षकांना पाठीशी घालाणाराही गट तयार होतो. असे डबल ढोलकीचे काम न करता शिक्षकांवर ग्रामस्थांचा विधायक वचक राहण्याची गरज आहे.