कोल्हापूर : टोल आंदोलनात अग्रभागी असलेल्या प्रमुख आंदोलकांवरील खटले शासनाने मागे घेतले आहेत. मात्र, नुकसानभरपाई खटल्यातील दंड भरण्यासाठी पोलिसांकडून आठ जणांना शुक्रवारी पत्रे पाठविण्यात आली आहे. ऐन दिवाळीत अशी पत्रेवजा नोटीस मिळाल्याने कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त होत आहे.आयआरबी कंपनीने कोल्हापूर जिल्ह्यात रस्ते बांधले, त्यानंतर शहरात आठ ठिकाणी टोलनाके उभारले होते. टोलची आकारणी विरोधात टोलविरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी २०११ मध्ये आंदोलनाचे हत्यार उपसले होेते.
यावेळी मोर्चा, आंदोलन, चक्का जाम असे आंदोलन केले होते. याप्रकरणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. हे खटले मागे घेण्याबाबत आंदोलकांकडून अर्ज आले होते. त्यानुसार जिल्हा स्तरीय समितीची बैठक २० मार्च २०१७ झाली. त्यात नुकसान भरल्यास पात्र ठरवून खटले मागे घेण्याची शिफारस झाली होती.
ही नुकसानभरपाई भरल्यानंतर गुन्हा शाबित किंवा केल्याचे सिद्ध होणार नव्हते. याबाबतचे गुन्हे शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. त्या नुकसानीच्या खटल्यात दंड भरण्याच्या नोटिसवजा पत्रे शुक्रवारी जिल्हा विशेष शाखेने अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या सहीने पाठविली.
बाबा इंदूलकर यांच्यासह आठ जणांना ३ नोव्हेंबरला अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या कार्यालयाकडून ही पत्रे गेली आहेत. २० हजाराचा दंड भरण्याचा त्यात उल्लेख आहे. या नोटीसवजा पत्रांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ज्यांच्यावर असे खटले दाखल झाले आहेत. ते निर्देशानुसार भरपाई भरू शकतात. जे भरणार नाहीत त्यांचे खटले सुरू राहणार आहेत, असे पोलीस प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.