सांगली : तासगाव साखर कारखान्याकडील १ एप्रिल २००४ ते जुलै २००५ या कालावधीतील ७५० कर्मचाऱ्यांची फंडाची सुमारे अडीच कोटीची रक्कम भविष्य निर्वाह निधी विभागाकडे भरलेली नाही. याप्रकरणी कोल्हापूर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने तासगाव कारखान्याकडील अवसायक मंडळाला तीन नोटिसा बजावल्या आहेत. तरीही अवसायक मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतेही उत्तर मिळाले नसल्यामुळे अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवसायक मंडळाकडील अधिकारी अडचणीत सापडल्याची चर्चा आहे.तत्कालीन कारभाऱ्यांनी नेत्यांच्या इशाऱ्याने कारखान्यासाठी खरेदी केलेल्या यंत्रसामग्रीची किंमत दहापटीने दाखवली. मग कारखाना डबघाईला येण्यास वेळ लागला नाही. २००० मध्ये आर्थिक अडचणीमुळे शासनाने प्रशासक नियुक्त केला़ २००३-०४ मध्ये प्रशासक आणि कामगारांनी पुढाकार घेऊन गळीत हंगाम यशस्वी केला़ त्याबाबत कामगार सांगतात, ‘राज्य बँकेने वेळेवर कर्जपुरवठा केला नसतानाही १४ कोटींचे उत्पन्न मिळाले़ हजार-दोन हजाराच्या तुटपुंज्या पगारावर कामगार राबले़ उसाला अन्य कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला़ मात्र कुठे तरी माशी शिंकली आणि दुसऱ्या हंगामाला राज्य बँकेने अर्थसहाय्यच दिले नाही़ त्यामुळे २००४-०५ च्या हंगामात पुन्हा कारखान्याचे धुराडे बंद राहिले़’ या कालावधित कामगार नियमीत कारखान्यावर येत होते. या कामगारांना पगार मिळावा, अशी याचिका साखर कामगार संघटनेचे सदाशिव देवर्षी आणि हिंमत पाटील यांनी दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने कारखान्याकडे सध्या असलेल्या अवसायक मंडळाच्या अधिकाऱ्यांना कामगारांचा थकित पगार देण्याची सूचना केली होती. त्यानुसार निर्वाह भत्ता (रिटेन्शन अलाऊन्स) अवसायक मंडळाने दिला आहे. परंतु, कामगारांच्या फंडाची रक्कम अवसायक मंडळाने भविष्य निर्वाह निधी विभागाकडे भरली नाही. अवसायक मंडळाच्या या कारभाराविरोधात कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा सांगलीच्या औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करून फंडाची रक्कम भरण्याची मागणी केली होती. याचा निर्णयही कामगारांच्या बाजूने झाला आहे. त्यानुसार कोल्हापूर येथील भविष्य निर्वाह कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त पी. बी. खुने यांनी अवसायक मंडळाचे अध्यक्ष व्ही. वाय. सुर्वे यांना तीन नोटिसा बजावल्या आहेत. तरीही त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही, असे खुने यांनी सांगितले. सुर्वे यांना अंतिम नोटीस बजावून संबंधित कामगारांची फंडाची सर्व कागदपत्रे आणि थकित रक्कम भरण्याची सूचना दिली आहे. पैसे वाटपाचीही होणार चौकशीतासगाव साखर कारखान्याकडील कामगारांच्या पगाराची थकित रक्कम १३ कोटी ७८ लाख रूपये अवसायक मंडळाकडून वाटप केली आहे. कामगारांना पैसे वाटप करताना काही नेतेमंडळींनी कामगारांकडून सक्तीने ६ टक्के रक्कम कपात करून घेतली होती. पैसे मागतानाची चित्रफीत कामगारांनी एका नेत्याकडे दिली असून त्याच्याआधारे फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. तसेच अवसायक मंडळाच्या कारभाराची चौकशीही लावण्यासाठी कारखान्यातील एक गट सक्रिय झाला आहे, असे खात्रीशीर सूत्राने सांगितले.
तासगाव कारखान्याच्या अवसायकांना नोटीस!
By admin | Published: November 05, 2014 12:48 AM