इचलकरंजी : येथील उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलल्याप्रकरणी जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सात नगरसेवकांना नोटिसा लागू केल्या आहेत. याबाबत ३ मार्चला म्हणणे मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.नोव्हेंबर २०१६ मध्ये नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडी विरुद्ध कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस-शाहू आघाडी अशी निवडणूक झाली होती. निवडणुकीनंतर भाजप-ताराराणी आघाडी यांना बहुमतासाठी आवश्यक असलेला ३२ नगरसेवकांचा आकडा पार करता आला नव्हता. त्यांना फक्त २६ नगरसेवकांवरच समाधान मानावे लागले होते. याउलट कॉँग्रेस-राष्ट्रवादी-शाहू आघाडी यांचे ३५ नगरसेवक निवडून आले होते. नगरपालिकेकडील उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक ३० डिसेंबरला झाली. त्यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेसचे नगरसेवक राहुल खंजिरे यांना मतदान करण्याचा आदेश राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सातही नगरसेवकांना लागू केला होता.प्रत्यक्ष ३० डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सातही नगरसेवकांनी भाजप-ताराराणी आघाडीचे उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश मोरबाळे यांना मतदान केले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून अशोकराव जांभळे, कलावती जांभळे, नितीन जांभळे, लतीफ गैबान, मंगल मुसळे, तानाजी हराळे व शोभा कांबळे यांना पक्षादेश डावलल्याबद्दल नोटिसा लागू केल्या होत्या. तसेच या नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करण्याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या सातही नगरसेवकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ३ मार्चला दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातही नगरसेवकांनी भाजप-ताराराणी आघाडीचे उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रकाश मोरबाळे यांना मतदान केले. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून अशोकराव जांभळे, कलावती जांभळे, नितीन जांभळे, लतीफ गैबान, मंगल मुसळे, तानाजी हराळे व शोभा कांबळे यांना पक्षादेश डावलल्याबद्दल नोटिसा लागू केल्या होत्या.
राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांना नोटिसा
By admin | Published: February 21, 2017 1:27 AM