लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : गतवर्षीच्या सार्वजनिक गणशोत्सव मिरवणुकीत पोलिसांचे आदेश धुडकावून डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या शहरातील पीटीएम, फिरंगाई, प्रॅक्टिस क्लब, वाघाची तालीम यांच्यासह सोळा मंडळांचे उत्सव समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, डॉल्बी व ट्रॅक्टरमालक अशा सुमारे ७५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत. या सर्व कार्यकर्त्यांना २४ ते २८ जुलैपर्यंत सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वर्षभरात साजऱ्या होणाऱ्या विविध सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील सार्वजनिक तरुण मंडळांची बैठक घेऊन, नियम डावलून डॉल्बी लावणाऱ्या तरुण मंडळांवर कठोर कारवाई करण्याची घोषणा पोलीस प्रशासनाने केली होती, तसेच प्रत्येक मंडळाला तशी लेखी नोटीसही बजाविली होती. निवासी परिसरात ५५ डेसिबल इतक्या आवाजाची मर्यादा मंडळांना घालून दिली होती. तसेच डॉल्बी लावल्याने मानवी आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांचे जाहिरातींच्या माध्यमातून प्रबोधनही केले होते; परंतु गणेशोत्सवातकाही मंडळांनी डॉल्बीमुक्त उत्सवाचे पोलिसांचे आदेश धुडकावून डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण केले. त्या १६ मंडळांचे उत्सव समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, डॉल्बीमालक, ट्रॅक्टरमालक यांच्या विरोधात पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. डॉल्बी लावून हिंसक नाचकाम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण, प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनिक्षेपक मापन यंत्राद्वारे तपासलेली डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा, वृत्तपत्रांतील बातम्या, छायाचित्रे, सरकारी पंचांची साक्ष, आदी पुराव्यांसह दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. आगामी गणेशोत्सवात ही मंडळे डॉल्बी लावण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक निशिकांत भुजबळ यांनी उपद्व्यापी सोळा सार्वजनिक गणेश मंडळांच्या विरोधात न्यायालयात अहवाल सादर केला. त्यानुसार न्यायालयाने या मंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, डॉल्बी, ट्रॅक्टर, जनरेटर मालक यांना समन्स पाठवून सोमवार दि.२४ ते २८ जुलै असे पाच दिवस न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. ही न्यायालयीन प्रक्रिया या गुन्ह्णाचा निकाल लागेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात मंडळांना डॉल्बी लावता येणार नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक भुजबळ यांनी दिली. मंडळांची नावे अशी : बागल चौक मित्र मंडळ, शाहूपुरी, फिरंगाई तालीम मंडळ, राजे संभाजी तरुण मंडळ, बीजीएम स्पोर्टस् (शिवाजी पेठ), पिंटू मिसाळ बॉईज (लक्षतीर्थ वसाहत), पाटाकडील तालीम मंडळ (पीटीएम), प्रॅक्टिस क्लब-सुबराव गवळी तालीम मंडळ, नंगीवली तालीम मंडळ (मंगळवार पेठ), बाबुजमाल तालीम मंडळ (गुरुवार पेठ), वाघाची तालीम मंडळ (उत्तरेश्वर पेठ), आझाद हिंद तरुण मंडळ, दयावन ग्रुप, हिंदवी स्पोर्टस् (ताराबाई रोड), कै. उमेश कांदेकर युवा मंच, क्रांती बॉईज (रंकाळा टॉवर), रंकाळावेश तरुण मंडळ, गणेश तरुण मंडळ (राजारामपुरी) मंडळांचा अरेरावीपणा या उपद्व्यापी मंडळांनी डॉल्बी लावू नये म्हणून गणेशोत्सवाआधी घेतलेल्या बैठकीत पोलीस प्रशासनाला डॉल्बी न लावण्याची ग्वाही लेखी स्वरूपात दिली होती. त्यानंतरही या मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत अरेरावीपणा करीत घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेपेक्षा जादा डेसिबलची ध्वनी यंत्रणा आणून ध्वनिप्रदूषण केले होते. यंदा मात्र या मंडळांना न्यायालयीन प्रक्रियेमुळे चांगलाच चाप बसावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पीटीएमसह सोळा मंडळांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:47 AM