आंबा : विशाळगडावरील वाढत्या अतिक्रमणांना पायबंद घालण्यासाठी पुरातत्त्व विभागाने गडावरील पंधरा जणांना अतिक्रमणे काढून घेण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. पुरातत्त्व विभागाचे सहाय क संचालक विलास वहाणे यांनी याबाबतची माहिती दिली. गेल्या आठवड्यात वहाणे यांनी गडावर भेट देऊन अतिक्रमणांची चौकशी केली.
विशाळगड रक्षक व अतिक्रमण विरोधी कृती समितीने मार्च महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार ही कारवाई सुरू झाल्याने इतिहासप्रेमींतून समाधान व्यक्त होत आहे. वहाणे म्हणाले, गड व पायथ्याला वनविभाग, महसूल विभाग, खासगी मालकीच्या जमिनी आहेत. गेल्या दोन दशकांत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बेघर, इंदिरा आवास घरकुल योजना राबवल्या आहेत. स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गडाच्या मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. अतिक्रमणविरोधी मोहिमेसाठी वनविभाग, महसूल व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करता येईल. त्याबाबत २६ जूनला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले. कोरोणामुळे या कारवाईला वेळ होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चौकट : विशाळगड अतिक्रमण विरोधी समितीने गडावर १९९८ पासून शंभरभर अतिक्रमणे झाल्याचे माहितीच्या अधिकारात समितीचे प्रमुख सुनील घनवट यांनी मिळवून, मुदतीत अतिक्रमणे न काढल्यास आंदोलन करून संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ऐतिहासिक विशाळगडावरील रणमंडळ टेकडी, कुवारबाव, दर्गा व बाजीप्रभू समाधीकडे जाणाऱ्या मार्गावर अतिक्रमणे थाटली आहेत. या गडावर तीस ऐतिहासिक साक्षीदार आहेत. पंधराजणांनी दोन ते चार मजली इमारती बांधल्या आहेत.