कोल्हापूर : प्राथमिक शाळा सुरू होऊनही शाळेवर न जाणा-या गगनबावडा तालुक्यातील चौघा प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा गुरुवार, दि. ७ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. गगनबावडा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी ९ नोव्हेंबर रोजी चार शाळांना भेटी दिल्या. तेव्हा या शाळांमधील चार शिक्षक विनापरवानगी गैरहजर राहिले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही बाब सोमवारी (दि. १८) झालेल्या शिक्षण समितीच्या सभेमध्ये सांगून संबंधितांवर कारवाईची मागणी केली. सभापती अंबरिश घाटगे यांच्यासह सर्वांनीच त्याला पाठिंबा दिला.
यानंतर लगेचच शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी ए. एस. काकडे, वि. मं. मुटकेश्वर, बी. एस. कोपरकर वि. मं. धुमाळवाडी, ए. डी. काळे, वि. मं. खोपडेवाडी, एस. डी. माहुरे, वि. मं. शिंदेवाडी या चार शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अनधिकृतपणे गैरहजर राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्याने जि. प. जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियमानुसार पुढील प्रशासकीय कारवाई का करू नये, अशी विचारणा या नोटिसीतून करण्यात आली आहे.धाडस कसे होते ?शाळा सुरू होऊनही कोणालाही सूचना न देता, परवानगी न घेता गैरहजर राहण्याचे प्राथमिक शिक्षकांचे धाडसच कसे होते, असा सवाल शिक्षण समितीच्या सभेत उपस्थित करण्यात आला. गावात, परिसरामध्ये लोकप्रतिनिधी आहेत, याची भीतीही न बाळगता हे शिक्षक गैरहजर राहिले कसे, अशी विचारणा यावेळी करण्यात आली.