कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीसाठी अधिसूचना काढण्यासाठी प्रशासकीय अनुकूलता दिसत आहे. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (२) यांनी हद्दवाढीला हिरवा कंदील दाखविला आहे. ३० जूनपर्यंत अधिसूचना निघण्याची शक्यता असून, महापालिकेने महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ नुसार नगरविकास विभागाने हरकती व सूचनांसाठी काढावयाची प्रारूप अधिसूचना तयार केली असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. महासभेनंतर हद्दवाढीचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात गेला आहे. त्यानंतर विशेष अधिकारात त्वरित निर्णय घ्यायचा की, गेल्या ४० वर्षांप्रमाणे हा प्रश्न लाल फितीत भिजत ठेवायचा हे सर्वस्वी राज्य शासनावर अवलंबून आहे. कोल्हापूर शहरात प्रस्तावित सर्व २० गावांचा समावेश करण्यास नगरविकास संचालकांनी हिरवा कंदील दर्शविला आहे. नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनीही शहराची हद्दवाढ गरजेची असल्याचे खासगीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. हद्दवाढीच्या निर्णयात बाधित होणारी सर्व गावे व व्यक्तींना याची माहिती व्हावी, यासाठी नगरविकास मंत्रालय अधिसूचना जाहीर करते. या अधिसूचनेद्वारे बाधित व्यक्तींच्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेतली जाते. दिलेल्या तारखेपर्यंत नगर विकास विभागाचे प्रधान सचिव (२) विचार करून शासनास अभिप्राय देतात. हद्दवाढीचा पहिला टप्पा समजली जाणारी ही अधिसूचना कशा स्वरूपाची असेल, याचा प्रारूप आराखडाही महापालिकेने तयार केला आहे. आता अधिसूचना जाहीर करण्याची तारीख फक्त बाकी आहे. ३० जूनपर्यंत शासनाकडून महापालिकेला पत्र येणे अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
हद्दवाढीची अधिसूचना तयार
By admin | Published: June 25, 2015 1:25 AM