इचलकरंजी : कोणीही उठून उमेदवार जाहीर करायचा आणि त्याला हात उंचावून मतदान करायचे ते दिवस आता गेले आहेत. त्यामुळे कॉँग्रेसने सर्वसमावेशक उमेदवार उभा केल्यास पाठिंबा दिला जाईल; अन्यथा याबाबतचा निर्णय कार्यकर्त्यांशी आढावा बैठक घेऊन जाहीर करण्यात येईल, असे ठाम मत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी सकाळी आवाडे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत आवाडेंनी ही भूमिका घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रकाश आवाडे म्हणाले, ताराराणी विकास आघाडीचे दोन व स्वाभिमानी संघटनेचे दोन अशा चार सदस्यांबाबत आम्ही एकत्रित निर्णय घेणार आहोत. त्याबाबत खासदार राजू शेट्टी यांच्याशी तशी चर्चाही झाली आहे. तसेच बैठकीवेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी कॉँग्रेस पक्षाबरोबर एकनिष्ठ राहूनही आवाडे यांच्यावर पक्षाकडून वारंवार अन्याय केला असल्याचा पाढा वाचला. त्यावेळी दोघा नेत्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही कॉँग्रेसच्या उमेदवाराला साथी द्यावी, असे आवाहन केले.यावेळी आमदार मुश्रीफ व पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, जातीयवादी भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी कॉँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना यांची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्षाकडून आवाडेंवर अन्याय झाला हे सत्य आहे; पण सध्याच्या परिस्थितीत राजकारणातील सर्वांत मोठा शत्रू असलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आवाडेंनी आपल्या पाठीशी राहावे. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, जि. प. सदस्य राहुल आवाडे, पंचायत समिती सदस्य महेश पाटील, शेखर शहा, सुनील पाटील, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)पी. एन. पाटील यांनी हट्ट सोडावाकॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी आपल्या मुलाचा हट्ट सोडून सर्वसमावेशक व ज्येष्ठ सदस्य असलेले बंडा माने यांना उमेदवारी द्यावी. आम्हीही आमच्या मुलासाठीच्या उमेदवारीचा हट्ट सोडण्यास तयार आहोत. मात्र, केवळ आपलीच उमेदवारी रेटण्यासाठी त्यांचा हा सर्व अट्टाहास सुरू आहे, अशी टीका केली.आवाडेंची भूमिका काय राहणार?आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे सुद्धा आपल्या संपर्कात असून, त्यांच्याशीही चर्चा सुरू आहे. मात्र, निर्णय झाला नाही, असेही प्रकाश आवाडे यांनी सांगितले. एकूणच घडणाऱ्या घडामोडी पाहता आवाडेंची भूमिका काय राहणार? ते नेमके कोणाला पाठिंबा देणार? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
कोणालाही हात वर करायचे दिवस गेले आता
By admin | Published: March 21, 2017 12:55 AM