प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : निवडणुकीतील गैरप्रकारांवर नजर ठेवून ते रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सी-व्हीजील’ अॅपची निर्मिती केली आहे. त्याचा वापर प्रथमच येत्या लोकसभा निवडणुकीत होणार आहे. या अॅपमध्ये माहिती भरण्याचे काम जिल्हा निवडणूक विभागाकडून सुरू आहे. मतदारांसाठी नववर्षातील ही ‘गुड न्यूज’ आहे. या अॅपमुळे गल्ली बोळात होणाऱ्या पैसे वाटपापासून जेवणावळी, आचारसंहितेचा भंग, आदींची माहिती कोणत्याही नागरिकाकडून फोटो काढून अपलोड केल्यास निवडणूक विभागाकडून कारवाई होणार आहे.या लोकसभा निवडणुकीत प्रथमच याचा वापर होणार आहे. या संदर्भात नुकतेच आयोगाकडून जिल्हा निवडणूक विभागांना निर्देश देण्यात आले असून, यामध्ये मतदान केंद्रनिहाय सर्व माहिती भरण्यास सांगितले आहे. त्यानुसार निवडणूक विभागाकडून जिआॅग्रॉफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम (जीआयएस) मॅपिंगद्वारे सर्व मतदान केंद्रांची इत्थंभूत माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.शासनाच्या इतर विभागांत नागरिकांना आपली तक्रार देण्यासाठी ‘टोल फ्री’ क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये या आॅनलाईन तक्रारीवर पुढील कार्यवाही होते. त्याच धर्तीवर निवडणूक आयोगाने ‘लाईव्ह पोर्टल’ असलेल्या या अॅपची निर्मिती केली आहे. हे अॅप मोबाईल फोनवरही नागरिकांना उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून निवडणूक काळात गल्लीबोळात सुरू असलेले पैसे वाटण्याचे प्रकार, जेवणावळी, आचारसंहिता भंगचे प्रकार मोबाईलवरून फोटो काढून ते अपलोड करता येणार आहेत. त्यानंतर ही माहिती सहजरीत्या जिल्हा निवडणूक विभागाकडे जाणार असून, त्यानंतर तेथून संबंधित भाग किंवा मतदान केंद्र ज्यांच्या अखत्यारीत येतो, त्या विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळविले जाईल. त्यानंतर ते संबंधितांवर तातडीने कारवाई करतील, अशा पद्धतीने या अॅपची रचना आहे.विशेष म्हणजे तक्रार करणाºया व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे.
निवडणुकीतील गैरप्रकारांवर आता ‘अॅप’द्वारे नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 12:53 AM