कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेली अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी संपली. त्यामुळे सायंकाळी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आता काय तरी होऊ दे...म्हणून थोडा सुस्कारा सोडला. आता माघारीसाठी व छुपी बंडखोरी टाळण्यासाठीच्या जोडण्या करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली.जिल्हा परिषदेची निवडणूक २१ फेब्रुवारीस व मतमोजणी दि. २३ ला आहे. आज, मंगळवारी छाननी व अर्ज माघारीची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत आहे; परंतु ज्यांची उमेदवारी निश्चित आहे, अशांनी प्रचार सुरू केला आहे. गावातील ‘कारभारी’ कार्यकर्त्यांना भेटून प्रचाराचे नियोजन करीत आहेत. काहींनी सोमवारी सायंकाळीच प्रचार साहित्याच्या आॅर्डर दिल्या. प्रचारासाठी वाहनांचे बुकिंग करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली. डिजिटल फलक, प्रचारपत्रके, गाण्यांच्या सीडी करण्यासाठी कार्यकर्ते घुमू लागले आहेत. अलीकडील काही वर्षांत राजकीय जागरूकता जास्त झाली आहे. पक्षाच्या विचारधारेचा प्रभाव कमी झाला आहे. नेत्यांच्या ‘शब्दा’ला कार्यकर्ते किंमत द्यायला तयार नाहीत. त्यामुळे उमेदवार यादी निश्चित करताना नेत्यांना चांगलाच घाम फुटला. त्यातही मोठी वशिलेबाजी झाली. काहींनी तर माजी मुख्यमंत्र्यांपासून पाहुणे-रावळे शोधून त्यांचीही ताकद उमेदवारी मिळविण्यासाठी वापरली. पक्षांनीही तो आपल्याशी किती एकनिष्ठ आहेत याचा विचार न करता त्याच्याकडे पैसा किती आहे, यंत्रणा किती राबवू शकतो आणि निवडून येण्याची क्षमता, जाती-पातीचा, घराण्यांचा विचार करून उमेदवारी दिली आहे.उमेदवार निश्चित झाल्याने कुठे ताकद लावायला हवी आणि कुणाची माघार व्हायला हवी, यासाठीच्या जोडण्याही सुरू झाल्या आहेत.सत्ता कुणाची...?जिल्हा परिषद निवडणूक मध्यावर आली असताना आता लोकांना सत्ता कुणाची येणार याचे वेध लागले आहेत. त्यामुळे जाईल तिथे ‘काय हो..काय होईल यावेळी’ अशी विचारणा लोक उत्सुकतेने करीत आहेत; परंतु या टप्प्यावरील राजकीय चित्र कमालीचे गोंधळाचे आहे. कुणा एका पक्षाची सत्ता येणार नाही हे स्पष्टच आहे; परंतु सभागृहातील सर्वांत मोठा पक्ष कोण ठरतो, यासाठीच या वेळेला ताकद पणाला लावणार आहे.
आता बंडखोरी टाळण्यासाठी जोडण्या!
By admin | Published: February 07, 2017 12:53 AM