परीक्षा रद्दचा निर्णय झाल्यानंतर गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यातील दहावीच्या ५६७४५ विद्यार्थ्यांना मूल्यमापन कसे होणार याची प्रतिक्षा लागली होती. ती प्रतिक्षा संपली. नववीच्या गुणांची माहिती शाळांमध्ये तयार आहे. बहुतांश शाळांमध्ये दहावीच्या अंतर्गत परीक्षांचे गुण देखील तयार आहेत. त्यामुळे मूल्यमापनाची प्रक्रिया शिक्षण विभागाने लवकर पूर्ण करून निकाल जाहीर करावा. दहावीची तयारी करायची असल्याने काही विद्यार्थी हे इयत्ता नववीमध्ये उत्तीर्ण होण्यापुरते लक्ष देतात. अशा विद्यार्थ्यांची आता मूल्यमापन करताना अडचण होणार आहे. दहावीची परीक्षा झाली नाही. मात्र, अकरावी प्रवेशासाठी सीईटी होणार असल्याने तेथे गुणवत्तेचा विचार आणि निकष लागणार आहे. त्यामुळे सीईटीबाबत विद्यार्थी, पालक समाधानी आहेत.
शिक्षक काय म्हणतात?
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनात नववीच्या परीक्षेतील गुणांचा विचार करण्याचा पर्याय चांगला आहे. मात्र, ज्यांना नववीमध्ये गुण कमी आहेत. अशा विद्यार्थ्यांची काहीशी अडचण होणार आहे.
-राजेश वरक, कोल्हापूर.
कोरोनाची सध्यस्थिती पाहता या मूल्यमापनाबाबत राज्य शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. दहावीच्या अंतर्गत परीक्षांतील गुणांचा देखील विचार होणार आहे.
-बी. बी. पाटील, वाकरे.
पालक, विद्यार्थी म्हणतात?
मूल्यमापनाचे धोरण ठरविण्यात शासनाचा बराच वेळ गेला. आता मूल्यमापनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून निकाल जाहीर करण्यात यावा.
-रेश्मा पठाण, पालक, शाहुपुरी.
अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित सीईटी घेण्याचा निर्णय चांगला आहे. त्याठिकाणी गुणवत्तेचा विचार होणार आहे.
-शामली जाधव, विद्यार्थीनी, आणजे (राधानगरी)
चौकट
शासन आदेशानुसार सीईटीची तयारी
जिल्ह्यात अकरावीची एकूण १८५ महाविद्यालये आणि त्यातील प्रवेश क्षमता एकूण ४९ हजार ६०० इतकी आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याची तयारी शासन आदेशानुसार करण्यात येईल, असे सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी सांगितले.