चौथा कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (किफ) १८ ते २५ डिसेंबर दरम्यान कोल्हापुरात होत आहे. त्या निमित्ताने विश्वात्मक सिनेमाला कवेत घेण्याची संधी पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना लाभणार आहे. त्यानिमित्ताने... विश्वात्मक अनुभूती देणारा सिनेमा हे आता केवळ आध्यात्मिकच (गूढार्थाने नव्हे), तर भौतिक पातळीवरूनही उन्नत करणारे एक आधुनिक साक्षात्कारी माध्यमच ठरले आहे. यादृष्टीने कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीने आपला चित्रपट संस्कृती रुजविण्याचा परीघ वाढवत २००९ मध्ये ‘मिनी किफ’ची सुरुवात केली. त्याचवर्षी ‘थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल’ झाला. ‘थर्ड आय’ची तीन वर्षे झाल्यानंतर ‘किफ’ सुरू होत त्याचीही तीन आवर्तने पूर्ण झाली. यंदा चौथ्या वर्षी पदार्पण करताना बाळ रंगू लागलेय, हे निश्चित! इफ्फी (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडिया, पणजी) आणि राज्य नाट्य स्पर्धा यांच्या तारखा दरवर्षीच क्रॉस होतात. त्यामुळे चित्रपटदर्दी असणाऱ्या कोल्हापुरातील रंगकर्मींना ‘इफ्फी’ची तहान ‘किफ’वर भागविण्याची संधी असते. आॅक्टोबर ते फेब्रुवारी हा चित्रपट महोत्सवांचा ऋतुच असतो. काहीजण ‘इफ्फी ते पिफ’ (१४ ते २१ जानेवारी) आणि मिफ (२८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी) व्हाया ‘किफ’ असाही फिल्म फेस्ट बर्ड बनून आस्वाद घेत राहतात. ‘इफ्फी’चे बजेट मोठे, काही कोटींचे; शिवाय तो देशाचा महोत्सव, तर ‘पिफ’ महाराष्ट्र सरकारचा अधिकृत महोत्सव. तेव्हा भव्यता, थिएटर एक्स्पेरिएन्स, नवीन चित्रपट, संख्या या पातळीवर ‘किफ’शी तुलना करून चालणार नाही. मात्र, त्यादृष्टीने जाण्यासाठी राज्य शासनाची अधिकाधिक मदत मिळणे, मल्टिप्लेक्स मालकांनी चित्रपट धंद्याच्या पुढे जात चित्रपट संस्कृतीच्यादृष्टीने विचार करीत थोडेसे औदार्य दाखविणे, मराठीतील दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ केवळ स्वत:च्या नवीन फिल्मच्या प्रोमोसाठी उपस्थिती लावतात, त्यापलीकडे जाऊन त्यांनी सहभाग घ्यायला हवा. तसेच लघुपटकर्ते, विद्यार्थी, रसिकांनीही वाढता सहभाग द्यायला हवा. चित्रपट म्हणजे केवळ थिल्लर करमणूक नव्हे, हे लक्षात घेऊन चित्रपट ही एक ज्ञानशाखा आहे, याची जाणीव समाजमाणसांत रुजवायला हवी. माय मराठीच्या (तब्बल दहा; पण केवळ नवे कोरे चित्रपट हा निकष काहीतरीच वाटतो. परंतु, गम्मत म्हणजे प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद यालाच असतो. तरी यंदा यांचे रिपीटस्क्रिनिंग्ज नाहीत) ओढ्यातून विविध भारतीच्या अन्य प्रादेशिकपटांच्या नदीत डुंबताना आंतरभारतीय एकात्मता निर्माण व्हायला हवी. त्यातून पुढे महासागरात जात विश्वात्मकताही कवेत घ्यायला हवी! हे सारे ‘किफ’सारख्या महोत्सवात शक्य असते. सर्व भाषांबद्दल मनात आदर ठेवूनही मला फक्त एकाच भाषेतील चित्रपट आवडतात, ती म्हणजे चित्रपटीय वैश्विक भाषा!! अपेक्षा ‘किफ’कडून : वेळापत्रक व कॅटलॉग वेळेवर मिळतील, बदल कमीत कमी होतील. सोहळे आटोपशीर होतील. (मान्यवर माईकवर कमी वेळ बोलतील तर ?) खुला मंच हा एकतर्फी प्रक्षेपण न राहता संवादी राहील. फिल्म स्क्रिनिंग्ज वेळेवर सुरू होतील.अपेक्षा प्रेक्षकांकडून :मोबाईल आॅफ, किमान सायलेंट ठेवून चित्रपटगृहात वापर न करता अंधार आणि शांततेचा आदर राखायला शिकतील.डॉ. अनमोल कोठाडिया
आता विश्वात्मके सिनेमे
By admin | Published: December 17, 2015 12:58 AM