दीपक जाधव
कदमवाडी : खून, बलात्कार, बाॅम्बस्फोट यांसारख्या गंभीर गुन्ह्यांबरोबरच मातृत्व, पितृत्वाची खात्री पटवण्यासाठी करावी लागणारी डीएनए चाचणी आता कोल्हापूरमध्येही करता येणार आहे. ताराराणी चौकातील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत १५ जुलैपासून ही चाचणी सुरू होणार आहे. सध्या या चाचणीसाठी पुणे येथील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत जावे लागत होते.
केद्र शासनाच्या निर्भया योजनेंतर्गत कोल्हापूरमध्ये ५३.७० लाखांच्या निधीतून डीएनए तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात आली असून, याचे कामकाज १५ जुलैपासून कोल्हापूरमध्ये सुरू होत आहे. याचा फायदा कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग पोलिसांना होणार आहे.
कोल्हापूर विभागातील सुमारे चारशे गुन्ह्यांतील सॅम्पल दरवर्षी पुणे येथे पाठवण्यात येतात. त्यामुळे येथून अहवाल येण्यास काही प्रमाणात विलंब होत होता. परिणामी पोलिसांना दोषारोपपत्र दाखल करण्यात उशीर होत होता. आता कोल्हापूरमध्ये ही चाचणी सुरू होत असल्याने तपासासाठी गती मिळणार आहे.
कोट : गंभीर गुन्ह्यांची उकल करणे, मातृत्व, पितृत्व सिद्ध करणे यासाठी डीएनए चाचणी हा अतिशय परिणामकारक पुरावा मानला जातो. ही चाचणी कोल्हापुरातील प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळेत सुरू करण्यात येत असून, त्याचा कोल्हापूरसह शेजारील पोलीस दलांना फायदा होणार आहे.
-डाॅ. कृष्णा कुलकर्णी, संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, मुंबई
फोटो : १४ डीएनए चाचणी
ताराराणी चौकातील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत १५ जुलैपासून या विभागात डीएनए चाचणी सुरू होणार आहे.
(छाया : दीपक जाधव)