कोल्हापूर : कोरोनामुळे मयत होणाऱ्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरापेक्षा जिल्ह्यातील तसेच अन्य जिल्ह्यातील रुग्णांची संख्या मोठी आहे, त्यामुळे अन्य जिल्ह्यातील गर्भगळित नातेवाईक मृतदेह नदी घाटावर अंत्यसंस्कार होईपर्यत थांबतात. अग्नी दिला की ‘आता रक्षा विसर्जनही तुम्हीच करा’, असा निरोप देऊन नातेवाईक हुंदके देतच घरची वाट धरतात. काही नातेवाईक तर नदीपर्यंत सुध्दा पोहचत नाहीत.
काेल्हापूर शहरातील खासगी रुग्णालयात तसेच छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कोल्हापूर शहर हे सर्व रोगावरील उपचाराचे एक प्रमुख केंद्र असल्याने येथे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून तसेच अन्य जिल्ह्यातून रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत आहेत. सध्या कोरोना बाधित रुग्णही मोठ्या संख्येने कोल्हापुरात येत आहेत. उपचार होऊन अनेक जण घरी परततात.
बाहेरच्या जिल्ह्यातील अत्यवस्थ रुग्णासोबत एक-दोन नातेवाईक कोल्हापुरात वास्तव्य करत असतात. रुग्णालयाच्या बाहेर दूरवर थांबून संबंधित नातेवाईक आधीच गर्भगळित झालेले असतात. त्यात एकादा रुग्णाचा मृत्यू झाला तर अधिकच शोकमग्न होत आहेत. जवळचे कोणी नातेवाईक नसल्यामुळे अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याकरिता महापालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक जवळचे वाटतात.
मृतदेह शववाहिकेतून पंचगंगा स्मशानभूमीत नेईपर्यंत नातेवाईक असतात. परंतु स्मशानभूमीत जाण्याचे धाडस त्यांना होत नाही. त्यामुळे लांब उभे राहूनच अंत्यसंस्कार झाल्याची माहिती मिळेपर्यंत थांबतात. अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना नातेवाईक लांबूनच ‘आता रक्षा विसर्जनही तुम्हीच करा, आम्ही येत नाही’ असा निरोप देतात आणि जड अंत:करणाने तेथून काढता पाय घेतात.
बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत १७ कोविड मृतदेहावर महापालिका आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले. त्यावेळी काही नातेवाईक आले होते, पण काही जण आलेच नाहीत. नातेवाइकांचा निरोप लक्षात घेऊन सर्व १७ मृतदेहांची रक्षाही कर्मचाऱ्यांनी विसर्जित केली. रात्री साडेसात वाजता पाच मृतदेह एकाचवेळी स्मशानभूमीत आण्यात आले. त्यामुळे स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडला आहे.
शेणी,लाकडे, गॅसचा साठा मुबलक-
पंचगंगा स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याकरिता लागणाऱ्या शेणी, लाकडे, तसेच गॅस सिलिंडरचा साठा मुबलक प्रमाणात असल्याचे स्मशानभूमी अधीक्षक अरविंद कांबळे यांनी सांगितले. मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर रक्षा विसर्जन त्याच दिवशी केले जात असल्याने बेड मुबलक आहेत. परंतु नॉन कोविड मृतदेहाची रक्षाही त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी करावे, असे आवाहन कांबळे यांनी केले आहे.