कोल्हापूर : महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यामुळे आता ३५ महामंडळांच्या पदांकडे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नेते, कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर जिल्ह्यातील अनेक मान्यवरांना तोंडदेखले पद देण्याचा जो प्रकार भाजपने केला, तसे न करता दोन्ही कॉँग्रेस तातडीने पदे भरण्याला प्राधान्य देण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीमधील कर्तबगारीवर जिल्ह्यात सध्या जी शिवसेनेकडे पदे आहेत, त्यांच्याबाबतही फेरविचार होण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळामध्ये शिवसेना आणि दोन्ही कॉँग्रेस सहभागी असल्याने मंत्रिपदे देण्याला तीनही पक्षांना मर्यादा आली आहे. त्यामुळेच जी ३५ महामंडळे आहेत, त्यांवर वर्णी लावण्यासाठी आता अनेकांनी तयारी सुरू केली आहे. सध्या भाजपचे महेश जाधव हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. या समितीबाबत तातडीने फेरविचार होण्याची शक्यता आहे.
भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांच्याकडे वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद होते. तेथेही आता इतरांना संधी मिळू शकते. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन अनेक मान्यवरांना विविध महामंडळांची पदाधिकारी पदे जाहीर केली; परंतु याबाबतची पुढची प्रक्रिया पूर्ण करून राज्यपालांच्या सहीने या पदांची अधिकृत घोषणा शेवटपर्यंत झाली नाही. परिणामी या मान्यवरांना केवळ आपले नाव जाहीर झाले यावरच समाधान मानावे लागले.
अरुण इंगवले (महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, सदस्य), अजित रामभाऊ चव्हाण (पुणे ‘म्हाडा’ सदस्य), प्रवीण सावंत (महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर ‘शासननियुक्त’ सदस्य), विजय जाधव (पर्यटन विकास महामंडळ, सदस्य), राहुल चिकोडे (औद्योगिक विकास महामंडळ, सदस्य), सुनील शिंत्रे (महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, सदस्य), विजय देवणे (उर्वरित वैधानिक विकास महामंडळ, सदस्य), आर. डी. पाटील (कृष्णा खोरे विकास महामंडळ, सदस्य), प्रवीण यादव (पुणे म्हाडा, सदस्य), मुरलीधर जाधव (हातमाग महामंडळ, सदस्य), महावीर गाट (जीवन प्राधिकरण, सदस्य) यांची नावे जाहीर करण्यात आली. मात्र याबाबत शासनाचा आदेश शेवटपर्यंत आला नाही.
यातील शिवसेनेच्या काही नेत्यांची नावे कायम राहू शकतात. मात्र भाजपच्या नावावर साहजिकच खाट मारली जाणार असून, त्या जागी नवनियुक्ती केली जाणार आहे. समरजितसिंह घाटगे यांनी आधीच पुणे ‘म्हाडा’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तीनही पक्षांतील सदस्यांचे समाधान करावयाचे असल्याने आता या कोल्हापूर जिल्ह्यातील किती नेते, कार्यकर्त्यांना महामंडळांवर संधी मिळणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.