..आता कशी वाजवली घंटी, काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना डिवचलं; कोल्हापुरातील फलक चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 04:18 PM2024-06-11T16:18:43+5:302024-06-11T16:19:49+5:30
कोल्हापूर : आता कशी वाजवली घंटी.. अशी विचारणा करणारा आणि मुख्यमंत्र्यांनाच थेट डिवचणारा फलक आमदार सतेज पाटील यांच्या छायाचित्रासह ...
कोल्हापूर : आता कशी वाजवली घंटी.. अशी विचारणा करणारा आणि मुख्यमंत्र्यांनाच थेट डिवचणारा फलक आमदार सतेज पाटील यांच्या छायाचित्रासह युवक कॉंग्रेस, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी सोमवारी दाभोळकर कॉर्नरला लावून धमाल उडवून दिली. कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून शाहू छत्रपती विजयी झाले आणि शिंदेसेनेचे उमेदवार माजी खासदार संजय मंडलिक पराभूत झाल्याने हा फलक झळकला आहे.
त्याचे घडले असे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात उमेदवार होते. हे दोन्ही उमेदवार जिंकायलाच पाहिजेत यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. अनेक जोडण्या लावल्या. त्यासाठी ते येथे अनेक दिवस तळ ठोकूनही होते. प्रचाराच्या सांगता रॅलीसही ते ५ मे रोजी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी कोल्हापूरसाठी आपल्या सरकारने विविध कामांसाठी प्रचंड निधी दिल्याची आठवण करून दिली. आमच्या सरकारने टोल घालवला; परंतु तो कुणा लादला होता अशी विचारणा त्यांनी रॅलीतील कार्यकर्त्यांना केली.
त्यावर कार्यकर्त्यांनी बावड्याच्या बंटी पाटील यांनी असे उत्तर दिले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याच बंटी पाटलांची या निवडणुकीत आपल्याला घंटी वाजवायची आहे, असे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात मंडलिक यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसने आता कशी वाजली घंटी.. अशी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारणारा करणारा फलक लावला. त्याची दिवसभर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली.