इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकलेल्या कैद्यांची प्रकरणे लवकर निकाली निघावीत, व्यक्ती गुन्हेगार असेल तर शिक्षा आणि निर्दोष असेल तर गजाआडच्या जगातून लवकर मुक्तता व्हावी यासाठी राज्यातील कारागृहांमध्ये जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणच्यावतीने कारागृहात विधि सेवा संरक्षण व आधार केंद्र म्हणजेच कायद्याचे दवाखाने सुरू होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पिटीशन नंबर ४१६/१३ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार हे दवाखाना सुरू होत आहेत.शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात. याचे कारण हेच असते की, एकदा प्रकरण न्यायालयात गेले की वर्षानुवर्षे न्यायालयाच्या चकरा मारण्यापलीकडे हाती काही पडत नाही. आजोबाने न्यायासाठी केलेल्या दाव्याचा निकाल नातू म्हातारा झाल्यावर लागतो, असे उपहासाने म्हटले जाते. न्याय उशिरा मिळणे किंवा वर्षानुवर्षे प्रकरण तिष्ठत राहणे ही देखील अन्यायाचीच एक बाजू असते. काहीवेळा कैदी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असतो, तर काही प्रकरणात व्यक्ती गुन्हेगार असली तरी वर्षानुवर्षे निकालच लागत नाही.कारागृहातील वास्तव्यादरम्यान अनेक कैदी आजारी पडतात, काहीजणांना हृदयविकाराचा तीव्र झटका येतो. अशा वेळी त्यांना कारागृहातून दवाखान्यात आणेपर्यंत मोठा कालावधी जातो, त्यामुळे कैदी दगावतो. आजारी पडताच कैद्यावर प्रथमोपचार व्हावे यासाठी कारागृहात स्वतंत्र वॉर्डची गरज आहे. त्यामुळे प्राधिकरणच्यावतीने कळंबा कारागृहात कायद्याचा दवाखाना सुरू करण्यात येत आहे.कळंबा कारागृहात मंगळवारी उद्घाटनकोल्हापूर जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणच्यावतीने कळंबा कारागृहात विधि सेवा संरक्षण व आधार केंद्र म्हणजेच कायद्याचा दवाखाना सुरू करण्यात येत आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते दि. २१ रोजी याचे उद्घाटन होत आहे. त्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. येथील कैद्यांनाच विधि सेवक, स्वयंसेवक म्हणून तयार करण्यात येत आहे, तर कायदा आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची टीम येथे काम करणार आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यातील कैद्यांची माहिती घेणे, चौकशीसह विविध प्रक्रिया पूर्ण करणे, न्यायालयात केस लवकर सुरू व्हावी, तारखा न पडता लवकर निकाल लागावा यासाठी ही टीम काम करेल. व्यक्ती निर्दोष असेल तर त्यांची लवकर सुटका होईल आणि दोषी असेल तर शिक्षा सुनावली जाईल; पण प्रकरण रेंगाळत पडणार नाही ही यामागील संकल्पना आहे.
कारागृहांत आता कायद्याचे दवाखाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 7:23 PM