कोल्हापूर : सरकारने वाहन नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी १५ जून २०२१ पासून पूर्णपणे ऑनलाइन केली. त्यामुळे डिलरकडून नवीन वाहन ताब्यात घेतानाच त्या वाहनांस क्रमांक मिळत आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून अशा पद्धतीने सुमारे ८ हजार दुचाकी, तर १७५० चारचाकी व अवजड वाहनांची नोंद झाली आहे.
गेले कित्येक वर्षे नवीन वाहन खरेदी केल्यानंतर आपल्याला हवा तो क्रमांक मिळवण्याची मुभा होती. यासाठी जम्पींग करून त्याचे ठरलेले शुल्क भरल्यानंतर किंवा लिलावातून हवा तो क्रमांक वाहनधारकांना मिळत होता; मात्र केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने यात बदल केला आहे. पंधरा जूनपासून हा नवा नियम लागू केला आहे. यात वाहन खरेदी केल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने वाहनांची नोंदणी व क्रमांक मिळणार आहे. त्यामुळे डिलरकडूनच त्या वाहनांवर क्रमांक टाकला जाणार आहे. नवीन वाहनाला शोरुममधून काढल्यानंतर ते वाहन वाहनधारकाच्या दारात आणल्यानंतर त्यावर क्रमांकाची प्लेट लावलेली असते. यापूर्वी नवीन वाहन खरेदी केल्यानंतर हवा तो क्रमांक मिळेपर्यंत विना क्रमांकाचे वाहन रस्त्यावर चालवले जात असे. त्यात अनेकदा अपघात व अन्य दुर्घटना झाली तर वाहनधारकाला त्याचा विमा मिळण्यात अडचणी निर्माण होत. त्यामुळे सरकारने नवीन वाहन खरेदी केल्यानंतर ऑनलाइन वाहनांचा क्रमांक देण्याची नवीन प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया प्रादेशिक परिवहनच्या अंतर्गतच होत आहे.
खास क्रमांकासाठी जादा शुल्क
खास क्रमांकासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे रितसर पावती केल्यानंतर ती पावती डिलरला वाहन ताब्यात घेताना किंवा खरेदी केल्यानंतर दाखविणे गरजेचे आहे. अन्यथा चाॅईस क्रमांक ऐवजी सामान्य क्रमांक मिळेल. ही काळजी वाहनधारकाने घेणे गरजेचे आहे. मालिकेत जे सामान्य क्रमांक आहेत, तेदेखील काहींसाठी लकी ठरणारे म्हणून खास होते. यात १५, १६, १९, ३२, ३४, ५६, २१२२, ३१३२ अशा क्रमांकांचा समावेश आहे.
प्रतिक्रिया
ही सुविधा ग्राहकांसाठी सुलभ व गतिमान झाल्यामुळे वेळ वाचतो. त्यामुळे या प्रक्रियेचे ग्राहकांतून स्वागत होत आहे.
-करण सोनवणे,
के.आर.मोटर्स