कोल्हापूर : गेल्या महिन्यापासून पूर्ववत सुरू झालेल्या कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवेला आता नागपूर शहराची जोड मिळाली आहे. अहमदाबाद प्रवासासाठी तिकीट नोंदणी करणाऱ्या प्रवाशांना तेथून नागपूरला जाण्याची सेवा उपलब्ध होणार आहे. या सेवेचा मंगळवार (दि. १७) पासून प्रारंभ होणार आहे.
इंडिगो कंपनीने दि. २२ फेब्रुवारीपासून कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा सुरू केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने या कंपनीने संबंधित सेवा स्थगित केली. प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दि. १७ जुलैपासून सेवा पूर्ववत सुरू झाली. व्यापार, व्यवसाय, उद्योग आणि पर्यटनानिमित्त कोल्हापूरमधून अहमदाबादला जाणारे आणि तेथून कोल्हापूरला येणारे अनेक जण आहेत. त्यांच्यासाठी या मार्गावरील विमानसेवा उपयुक्त ठरत आहे. कोल्हापूरमधून नागपूरला जाता यावे, या उद्देशाने कंपनीने अहमदाबादमार्गे नागपूरला जाण्याची सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून मंगळवार, गुरुवार, शनिवार असे तीन दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. या सेवेसाठी ऑनलाइन तिकीट नोंदणी सुरू झाली आहे. दरम्यान, या सेवेमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना अहमदाबादमार्गे नागपूरला जाण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे पर्यटनतज्ज्ञ बी. व्ही. वराडे यांनी गुरुवारी सांगितले.
चौकट
विमान बदलावे लागणार नाही
कोल्हापुरातून अहमदाबादमार्गे नागपूरला जाताना प्रवाशांना विमान बदलावे लागणार नाही. तेच विमान अहमदाबाद येथून पुढे नागपूरला जाणार आहे. दर मंगळवार, गुरुवार, शनिवारी सकाळी इंडिगोचे हे विमान अहमदाबादवरून सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी उड्डाण घेते. ते कोल्हापुरात सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास उतरते. त्यानंतर काही मिनिटांची विश्रांती घेऊन सुमारे १० वाजून ४० मिनिटांनी हे विमान कोल्हापुरातून पुन्हा अहमदाबादला जाते. दुपारी ते साडेबारा-पाऊण वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथे पोहोचते. आता नव्या बदलात हे विमान साधारणत: वीस मिनिटे अहमदाबाद येथे थांबून नागपूरला जाणार आहे.