संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दोन्ही हात नसलेल्या आणि अपघात अथवा एखाद्या दुर्घटनेमुळे ज्यांचे हात निकामी झाले आहेत, अशा व्यक्तींना, दिव्यांगांना आता संगणक वापरता येणार आहे. त्यांना संगणक वापरणे, हाताळण्यासाठी ‘स्पेक्टॅकल्स माऊस’ची मदत होणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील ओंकार शहाजी साळुंखे याने संशोधनातून हा स्पेक्टॅकल्स माऊस साकारला आहे.या संशोधनाच्या माध्यमातून ओंकार याने चष्म्याचा वापर करून हा स्पेक्टॅकल्स माऊस बनविला आहे. त्यासाठी त्याने वायरलेस आणि ब्लूटूथ तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. मान वळवून, डोळ्यांची हालचाल आणि डोके वर-खाली करून हा माऊस वापरता येतो. त्याच्या माध्यमातून संगणक अथवा लॅपटॉपचा सहजपणे वापर करता येतो. शिवाय त्याद्वारे टायपिंगही करता येते.हा माऊस त्याने १९९७ रुपयांमध्ये बनविला आहे. त्याच्या या संशोधनाला शिवाजी विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवात तंत्रज्ञान विभागात प्रथम क्रमांक मिळाला. त्याच्या उपकरणाची राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संशोधनासाठी त्याला इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागप्रमुख डॉ. आर. के. कामत, सहायक प्राध्यापक पी. ए. कदम, एस. ए. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.या संशोधनाचे पेटंट घेणारएम. एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स) या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत असणारा ओंकार हा मूळचा अंबवडे (जि. सातारा) येथील आहे. त्याने साकारलेला स्पेक्टॅकल्स माऊस हा दिव्यांगांसाठी संगणक वापराच्या दृष्टीने एक वरदान ठरणारा आहे. या संशोधनाचे पेटंट घेणार आहे. त्यासाठी स्टार्टअपसाठीही त्याची नोंदणी करणार असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. आर. के. कामत यांनी सांगितले.
दोन्ही हात नसणाऱ्या व्यक्तींना आता वापरता येणार संगणक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:50 PM