कोल्हापूर : सरकारने ५०० व १००० च्या नोटा रद्द केल्यामुळे बँकांसह पोस्ट कार्यालयात नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांचा लोंढा वाढला. त्यामुळे बँकांवर ताण आला. त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने पेट्रोल पंपांवर एटीएमसारखी स्वॅप कार्डद्वारे दोन हजार रुपये देण्याची व्यवस्था केली आहे. त्यात पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या इंडियन आॅईलच्या १५ पेट्रोल पंपांवर ही सेवा शुक्रवारपासून सुरू झाली. बँकांसह पोस्ट कार्यालयावरील नोटा बदलून देण्याचा ताण वाढल्याने सरकारने देशातील सर्व पेट्रोल पंपांवर स्वॅप कार्डद्वारे दोन हजार रुपये देण्याची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात विविध तेल कंपन्यांचे ३५० हून अधिक पेट्रोलपंप आहेत. त्यात किसान सेवा असलेल्या ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांची संख्या अगदीच नगण्य आहे. त्यामध्ये इंडियन आॅईलच्या १५ पेट्रोल पंपांवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. याकरिता स्टेट बँकेचेच ‘पीओएस स्वॅप मशीन’ असणे गरजेचे आहे. त्यामुळे या सेवेवर शुक्रवारी मर्यादा आल्या. शनिवारपासून इतर बँकांही या सेवेत कार्यरत होणार आहेत. स्वॅप कार्ड मशीनही या बँका पेट्रोल पंपधारकांना उपलब्ध करून देणार आहेत. देशात २० हजार पेट्रोलपंप आहेत. त्यापैकी शुक्रवारी २००० पंपांवर ही सुविधा देण्यात आली.
आता पेट्रोल पंपांवरही मिळणार दोन हजार
By admin | Published: November 19, 2016 12:56 AM