- प्रदीप शिंदे -
कोल्हापूर : लांबच्या मार्गावर जाण्यासाठी प्रवाशांना आता बसस्थानकावर न जाता त्या मार्गावरील घराजवळच्या अधिकृत थांब्यावरून एस.टी.त बसण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने आॅनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमांमुळे प्रवाशांच्या वेळेची, पैशांचीही बचत होणार आहे, त्यासोबतच गाडीत बसण्यासाठी सीट मिळण्याची हमी आता मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एस. टी.ची सेवा ही सामाजिक बांधीलकी म्हणून अखंडपणे सुरू आहे. हक्काचे सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली ‘एस. टी.’ होय. हीच ‘लाल परी’ आता खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीने पावले टाकत आहे.
एस. टी. चे प्रवासी टिकविणे आणि त्यांना आधुनिक सुविधा देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने नवनवीन उपक्रम राबविले जात आहे. लांब पल्ल्यांच्या विनावाहक एस.टी सोडून इतर सर्व बसेसच्या आॅनलाईन बुकिंगची सोय करण्यात आली आहे. त्या मार्गावरील आता घराशेजारील अधिकृत थांब्यावरून प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महामंडळाने आरक्षणासाठी अँड्राईड मोबाईल अॅप, संकेतस्थळावरून ही सुविधा सुरू केल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना एस.टी.चे आगाऊ आरक्षण उपलब्ध असल्याने यांचा सहज लाभ घेता येणार आहे. -
-लांबच्या मार्गावरील गाडीसाठी सुविधा...
.बसस्थानकापासून पन्नास किलोमीटरपर्यंतच्या मार्गावरील गावातील अधिकृत थांब्यावरून तुम्हाला ही सुविधा मिळणार आहे. (उदा. मुंबई, पुणे, बंगलोर, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, लातूर, गोवा यासारख्या लांबच्या मार्गावरील कोणत्याही गाड्यांचे आॅनलाईन बुकिंग करू शकणार आहात.) बुकिंग केल्यानंतर एस. टी. त बसण्यासाठी तुम्हाला मुख्य बसस्थानकावर न जाता या मार्गावरील घराजवळील संबंधित अधिकृत बसथांब्यावरून गाडीत बसता येणार आहे. त्यासोबतच तुम्ही ज्या टप्प्यांवरून गाडीचे बुकिंग केले आहे व ज्या ठिकाणी उतरणार आहे तेवढेच पैसे प्रवाशांना मोजावे लागणार असल्याने पैशांची व वेळेची बचत होणार आहे. आॅनलाईन बुकिंग केल्याने घराजवळील बसथांब्यावरून गाडी बसण्यासाठी सीटची हमी मिळणार आहे.
दिवाळीपूर्वी हा प्रयोग संपूर्ण राज्यात राबविला आहे. प्रवाशांचा वेळ, पैसे आणि गाडी बसण्यासाठी हमीही मिळत असल्याने प्रवाशांमधून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. प्रवाशांसाठी यासारखे अनेक उपक्रम भविष्यात राबविणार आहोत.
आर. आर. पाटील, महाव्यवस्थापक (वाहतूक), राज्य परिवहन महामंडळ
-एस. टी.चे आॅनलाईन बुकिंग केल्यानंतर नियोजित वेळेत बसस्थानकांवर जाण्यासाठी शहरातील वाहतुकीमधून धावाधाव करावी लागत होती. बसस्थानकापर्यंत जाण्याचा खर्च तो वेगळाच सोसावा लागत होता. या सुविधेमुळे पैशांची तर बचत होईलच. घराशेजारील बसथांब्यावरून गाडीत बसण्यासाठी सीट मिळणार आहे, ही वेगळीच सुविधा मिळत असल्याने हा एक वेगळाच फायदा आहे. - राजेंद्र खोत, प्रवासी -