कोल्हापूर : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी, शाडू मिळत नाही आणि या मूर्ती परवडतही नाहीत, तर दुसरीकडे शासनाकडून कोणत्याही सूचना नाहीत. या तिहेरी पेचातून स्वत:च मार्ग काढत कुंभारांनी आता प्लास्टर आणि शाडूमिश्रित गणेशमूर्ती बनविण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापुरातील बापट कॅम्पमध्ये शेकडोंच्या संख्येत या मूर्ती आकार घेत आहेत. गणेशमूर्तीबद्दल कुंभार समाजात प्रचंड संभ्रम असून, शासनाने याबाबत तातडीने नियमावली जाहीर करणे गरजेचे आहे.
गणेशोत्सवाला आता पाच महिने राहिले आहेत; पण जून महिन्यात पावसाळा सुरू होत असल्याने या काळात मूर्ती वाळत नाहीत, त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारीपासूनच कुंभार बांधव मूर्ती बनविण्यास सुरुवात करतात. महापूर आणि कोरोना सलग दोन वर्षे या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसला आहे. त्यामुळे कुंभारांकडून यावर्षीही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना परवानगी मिळावी अशी मागणी केली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चाही काढण्यात आला. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी प्लास्टरने प्रदूषण होत नाही याचा शास्त्रशुद्ध अहवाल द्या आम्ही तो शासनाला सादर करू, असे सांगितले होते. त्यानंतर याबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. शासनाने मार्गदर्शक नियमावलीच जाहीर केली नाही त्यामुळे वाट बघून कुंभारांनी मूर्ती बनविण्यास सुरुवात केली आहे. प्लास्टरला बंदी, शाडू मिळत नाही, शिवाय परवडतही नाही. या दोन्हींचा मध्यमार्ग काढून प्लास्टर व शाडूमिश्रित गणेशमूर्ती बनविल्या जात आहेत.
---
फसवणुकीच्या तक्रारी
गतवर्षी काही कुंभारांनी शाडूच्या म्हणून प्लास्टर व शाडूमिश्रित गणेशमूर्ती ग्राहकांना दिल्या. गतवर्षी कोरोनामुळे दारातच मोठ्या प्रमाणात मूर्तींचे विसर्जन केले गेले. मात्र प्लास्टरमिश्रित मूर्ती पाण्यात विरघळली नाही. त्यामुळे फसवणुकीच्या तक्रारी झाल्या, गैरसमज निर्माण झाले. देवाची मूर्ती म्हणून कोणी चिकित्सा करीत नाही; पण ग्राहकांना मूर्तीच्या प्रकाराची स्पष्ट कल्पना दिली गेली पाहिजे.
--
पर्यायांची निवड.. पण दरवाढ नक्की
कुंभारांकडून प्लास्टर, अस्सल शाडूपासून व प्लास्टर शाडूमिश्रित अशा तीन प्रकारच्या मूर्ती बनविल्या जात आहेत. प्रत्येकाला आवड आणि आर्थिक स्थितीनुसार मूर्ती निवडता येईल; पण सगळ्या प्रकारच्या मूर्तींची दरवाढ नक्की आहे. मूर्ती अस्सल शाडूची असेल तर एक फुटाची मूर्ती तीन-साडेतीन हजारांच्या पुढे, प्लास्टरची मूर्ती अकराशे आणि प्लास्टर-शाडूची मूर्ती असेल, तर पंधराशे असे दर असणार आहेत.
----
फोटो नं २३०३२०२१-कोल-गणेशमूर्ती
ओळ : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना न आल्याने कोल्हापुरातील बापट कॅम्प येथील कुंभार बांधवांनी प्लास्टर व शाडूमिश्रित गणेशमूर्ती बनविण्यास सुरुवात केली आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)