इचलकरंजी : हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाकडून आवाडे गटाला डावलल्याने या मतदारसंघात आता काँग्रेस विरुद्ध आवाडे अशीच लढत होणार आहे. त्यामुळे आवाडे गटावर आता अस्तित्व दाखविण्याची वेळ आली आहे. पक्षाकडून डावलले जाण्याच्या हालचाली दिसू लागल्याने आवाडे गटाने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागा कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय ठामपणे पेलणार की नेहमीप्रमाणे माघार घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यातील राजकीय वैर सर्वज्ञात आहे. त्यामुळे तिकीट वाटपात आवाडेंना डावलले जाणार याची जोरदार चर्चा सुरू होती, परंतु जिल्हा काँग्रेसच्या उमेदवार निवड समितीमध्ये प्रकाश आवाडे यांना सहभागी करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न प्रदेश पातळीवरून करण्यात आला होता. मात्र, जिल्हा काँग्रेसकडून आवळे गटाला झुकते माप देत, आवाडे गटाला ज्याठिकाणी वर्चस्व नाही अशा काही मोजक्या जागा देण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यास नकार देत आवाडे गटाने कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी स्थापन करून त्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार केला. त्याचवेळी ज्या ज्या ठिकाणी जिल्हा ताराराणी विकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्याठिकाणी काँग्रेस पक्षाने उमेदवार उभे करू नयेत अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली होती. मात्र, पक्षाने पहिल्याच फेरीत थेट रेंदाळ मतदारसंघातील उमेदवार जाहीर करून जणू आवाडे यांना आव्हानच दिले. त्यामुळे आता आवाडे गटाला स्वत:चे अस्तित्व सिद्ध करावेच लागणार आहे.कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्यावतीने हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ, हुपरी, पट्टणकोडोली, कबनूर आणि कोरोची या पाच जिल्हा परिषद आणि चंदूर, तारदाळ, कोरोची, कबनूर पश्चिम, कबनूर पूर्व, रेंदाळ, पट्टणकोडोली, रुई, हुपरी दक्षिण व हुपरी उत्तर या दहा पंचायत समितीच्या जागा लढविण्यात येणार आहेत. यामध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना यांच्यासह स्थानिक आघाड्यांशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु काही ठिकाणी अशा आघाड्या होण्याची चिन्हे सध्या तरी दृष्टिक्षेपात नाही. दरम्यान, आता काँग्रेस विरुद्ध आवाडे अशा लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, आवाडे आणि आवळे यांच्यात मतांची विभागणी होणार असल्याने त्याचा फायदा कोणाला होणार याची चर्चा सुरू झाली आहे. (वार्ताहर)आवाडे गटाने निर्णयावर ठाम राहावेगेल्या अनेक वेळचा अनुभव पाहता ऐन वेळेला माघार घेण्याची भूमिका आवाडे गटाने घेतली आहे. आता पुन्हा आवाडे गटाने माघार घेतल्यास ‘लांडगा आलारे आला’ अशी स्थिती आवाडे गटाची होईल. त्यामुळे आवाडे गटाने या निर्णयावर ठाम राहावे, असे राजकीय जाणकारांतून व कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे.
आता काँग्रेस विरुद्ध आवाडे
By admin | Published: February 05, 2017 12:34 AM