आजच्या स्त्रीच शिक्षण आणि
कार्यालयीन काम फक्त कर्तबगारीचे न राहता मातृत्वाचे आणि काैटुंबिक
कर्तव्याचे असायला हवे. तिच्यातील मूळ गुणांना वृद्धिंगत करणारे असावे.
कारण नुसत्या बुद्धीने जग चालणार नाही तर हृदयानेही ते पुढे जाणार आहे.
यासाठी आता समस्त्र महिलांनी नवसमाज उभारणीसाठी मातृत्व, काैटुंबिक, नवसमाज निर्मितीच्या कर्तव्याची क्रांती घडविणे गरजेचे आहे.
............
आजच्या आधुनिक
युगात एक शांत, आनंदी, प्रफुल्लित, प्रेमळ असा नवा मानव समाज निर्माण करणे गरजे असून याची संपूर्ण जबाबदारी महिला वर्गाची आहे. कारण प्रत्येक माता आपल्या अपत्यांना सुसंस्कारित करू शकते. आचार्य रजनीश म्हणतात, "एक हसणारी स्मितवदना स्त्री ज्या घरात असेल, जिच्या पावलात प्रेमाची गाणी असतील,
जिच्या चालण्यात झंकार असेल, जिच्या हृदयात प्रसन्नता असेल, जिला जगण्यातला एक आनंद मिळत असेल, जिचे श्वास-न-श्वास प्रेमाने भरलेले असतील, अशी स्त्री ज्या घराच्या केंद्रस्थानी असेल, त्या घरात एक नवा सुगंध, एक नवं संगीत निर्माण होईल आणि हा एका घराचा प्रश्न नाही. हा प्रत्येक घराचाच प्रश्न आहे. प्रत्येक घरात जर हे शक्य झाले तरच असा समाज निर्माण होईल जो शांत असेल, आनंदी असेल, प्रफुल्लित असेल." म्हणूनच आजच्या स्त्रीने सुसंस्कृत, सुज्ञ आणि प्रेमपूर्ण समाजाच्या बांधणीसाठी कर्तव्याची क्रांती करण्याची गरजेची आहे.
समाज जसा वैज्ञानिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीने उभा असतो
तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे समाजाचा मुख्य घटक असणारा माणूस त्याच्या
सुसंस्काराने, निकोप, प्रांजळ, प्रेमळ मनाने व व्यापक दृष्टिकोनाने उभा
असायला हवा. जशी माणसाची नीतिमत्ता तसा समाज, तशी परिस्थिती. म्हणून आजच्या स्त्रीला सर्वांत मोठं आव्हान आहे ते म्हणजे निकोप समाज उभारणीचं. निसर्गाने मातृत्वाचा हक्क जसा स्त्रीला दिला तसा प्रजननामधील मोठा हिस्सा ही स्त्रीचा आहे. म्हणून नऊ महिन्यांच्या गर्भसंस्कारामध्ये तिने विशेष काळजी घेतली पाहिजे. अध्यात्माची आणि योगाची मोठी परंपरा असणाऱ्या या भारतीय नारीने गर्भावस्थेमध्ये स्वतःची मानसिकता उत्तम प्रकारे जपली पाहिजे, विकसित केली पाहिजे. तिच्या आत्म्याची ताकद उच्च कोटीची असली पाहिजे जेणेकरून गर्भातील बाळ उत्तम अवस्थेत वाढत जाईल. न दिसणाऱ्या मुळाची काळजी घेतली तर झाड चांगले बहरेल. उत्तम फळे आणि फुले देईल. ही नवसमाजाची पहिली पायरी आपण यशश्वीपणे चढलो असे म्हणता येईल.
मातृत्व फक्त मुलाला
जन्म देण्यापर्यंतच मर्यादित नाही, तर त्याचे उत्तम संगोपन ही मातेची
जबाबदारी आहे. म्हणून आजच्या कर्तृत्ववान महिलेने मुलाच्या जन्मानंतर ही
मायेचा स्पर्श आणि आपला बहुमूल्य वेळ मुलांसाठी खर्च करायला हवा. बालपणातील मुलांची जडण-घडण आणि उत्तम संस्कार याने मुलांचे भविष्य बनेल. अर्थात सर्वच मुलांचे भविष्य उज्ज्वल, सुसंस्कारित आणि प्रेमाने भरलेले असेल तर ते या देशाचे सुज्ञ, सुजाण आणि जबाबदार नागरिक असतील. हा नवसमाज उभारणीचा दुसरा टप्पा असेल. सुज्ञ पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला मानाचे स्थान
असेल याला आपला पुराणकाळ आणि इतिहास साक्षी आहेच. स्त्री-पुरुष 'इक्वल' जरूर आहेत, पण “सीमिलर” नाहीत. त्या दोघात जमीन-अस्मानाचा फरक आहे,
त्यांच्यामध्ये एक मौलिक भिन्नता आहे,जी 'पोलॅरिटी' आहे त्याच्यामुळेच त्या
दोघात एवढं आकर्षण आहे. यामुळेच ती दोघे एकमेकांचे सहकारी, साथी, मित्र
होऊ शकतात. स्त्रीला पुरुषासारखं बनवून आपल्याला ते आकर्षण कमी करायच नाही तर तिच्यातील स्त्रीत्व जागृत करून तिच्यातील मायेने, हळुवारतेने एक नवीन
समाज उभा करायचा आहे. ज्यामध्ये भांडण नसेल, कलह नसेल, ईर्ष्या नसेल, वासना नसेल. असेल तो फक्त प्रेमाचा अखंड वाहणारा झरा......! म्हणून कुटुंबाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या स्त्रीने आपल्या पोटी जन्म घेणारे मूल हे प्रथम
उत्तम माणूस बनवण्याचे कर्तव्य केले पाहिजे. अनेक स्त्रियांनी केलेले
कर्तव्यच क्रांती होईल आणि या क्रांतीतूनच प्रेमपूर्ण, प्रफुल्लित व
शांततामय समाज निर्माण होईल अशी मला खात्री वाटते.
..........
प्रांजली रमेश खबाले
संजय घोडावत विद्यापीठ अतिग्रे , कोल्हापूर