कोल्हापूर : अव्वाच्या सव्वा भाडे आकारून परगावच्या प्रवाशांची लुबाडणूक करणाऱ्या रिक्षाचालकांना आता रिक्षामध्ये चालकाचे नाव, पत्ता, परमिटधारकाचे नाव अशी माहिती प्रदर्शित करावी लागणार असल्याने गैरप्रकारांना चाप बसणार आहे. त्यामुळे प्रवाशांतून या निर्णयाचे स्वागत होत आहे. काही रिक्षाचालक रात्रीच्या वेळी अव्वाच्या सव्वा भाडे आकारून एखाद्या प्रवाशाची लुबाडणूक करतात. प्रवाशाची कोणतीही मौल्यवान वस्तू रिक्षात राहिली तर त्या रिक्षाचा नंबर, रिक्षाचालकाचे नाव अन्यथा परमिटधारकाचा नंबर, आदी बाबींपैकी एक तरी बाब लक्षात राहते. त्यामुळे ओळखपत्र लावण्याची पध्दत अतिशय चांगलीच असल्याच्या लोकांतून प्रतिक्रिया आहेत. महाराष्ट्राच्या अन्य काही शहरात व बंगळूर, दिल्ली आदी मोठ्या शहरांत यापूर्वीच ही पध्दत सुरु आहे. त्यामुळे आपण ज्या रिक्षात बसलो आहोत, त्या चालकाचे नाव काय आहे याचीही माहिती प्रवाशाला सहजपणे मिळू शकते. भाडे जास्त घेतल्याच्या तक्रारी असल्या तरी कोल्हापुरात रिक्षाचालकांकडून रात्रीची लुटमार केल्याचा घटना कधी घडलेल्या नाहीत. परंतु तरीही प्रवाशांच्या सुरक्षितेच्यादृष्टीने ओळखपत्राचा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. एखादी वस्तू रिक्षात अथवा टॅक्सीत विसरली तर प्रदर्शित माहितीपैकी एक तरी खूण प्रवाशांच्या लक्षात राहू शकते. त्यामुळे प्राधिकरणाने घेतलेला निर्णय अत्यंत चांगला आहे. - रघू जाधव, कोल्हापूर कोल्हापुरातील बहुतांश रिक्षाचालक हे प्रामाणिक आहेत. मात्र, काही बिगरपरवानाधारक चालक रात्रीच्या वेळी रिक्षा चालवितात. त्यांच्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची लुबाडणूक, प्रसंगी मारहाण करून लूट केली जाते. त्यास आळा बसेल. या निर्णयाचे रिक्षाचालक बंधूही स्वागत करीत आहेत. - सुभाष शेटे, अध्यक्ष, करवीर रिक्षा युनियनरिक्षाचालक व रिक्षामालकाची माहिती रिक्षात प्रदर्शित केल्यामुळे रिक्षाचालकांना व्यवस्थित राहणे गरजेचे आहे. प्रवाशांशी सौजन्याने वागणे आता क्रमप्राप्त झाले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ताबडतोब करावी.- आनंदा नरकेशिवाजी पेठ, कोल्हापूर हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेच रिक्षाचालक फसवणूक करतात. मात्र, याचा फटका प्रामाणिक रिक्षाचालकांना बसतो. तरीही चालक व मालकाची माहिती प्रदर्शित करण्याचा निर्णय अत्यंत चांगला आहे. त्यामुळे प्रवाशांची फसवणूक होणार नाही. - सागर पाटील, राधानगरीरिक्षात प्रदर्शित करण्यात येणाऱ्या माहितीमुळे एखादी महिलाही रात्रीच्या वेळी बिनधास्तपणे एकटीसुद्धा प्रवास करू शकणार आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा हा निर्णय निश्चितच चांगला आहे. - अभिजित मोरे, सुभाषनगर, कोल्हापूर
आता रिक्षा प्रवास होणार सुखकर
By admin | Published: January 30, 2015 11:25 PM