कोल्हापूर : कराचा बोजा कोणाची जबाबदारी म्हणत राज्य व केंद्राने ‘तू तू-मैं मैं’चा खेळ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गुरुवारी किंवा शुक्रवारी साधे पेट्रोल शंभरीपार होईल. प्रिमियम पेट्रोलने तर केव्हाच शंभरी पार केली आहे. त्यामुळे वाहनधारकांचा कल सीएनजी अथवा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्याचीही शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.
चार फेब्रुवारीला पेट्रोलचा भाव ९३ रुपये ११ पैसे होता. डिझेलचा भाव ८२.३८ पैसे होता. बुधवारी हेच दर अनुक्रमे ९७ रुपये २१ पैसे व ८७ रुपये ०३ पैसे इतके होते. वीस दिवसांमध्ये पेट्रोल ४ रुपये १० पैशांनी, तर डिझेल ४ रुपये ६५ पैशांनी वाढले आहे. विशेष म्हणजे प्रिमियम पेट्रोल राज्यातील काही शहरांमध्ये शंभरपेक्षा अधिक रुपये लिटर झाले आहे. या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढण्यात झाला आहे.
प्रतिदिन ५ लाख लिटर पेट्रोल ..६ लाख लिटर डिझेल..
भाव वाढूनही जिल्ह्याला दिवसाकाठी पेट्रोल ५ लाख ३० हजार लिटर, तर डिझेल ६ लाख २० हजार लिटर इतके लागत आहे. तितका साठा डेपोंमधून रोज उचलला जात आहे. सामान्य माणूस कितीही संतप्त झाला असला तरी इंधनाची गरज त्याला लागतेच.
सीएनजीसह इलेक्ट्रिक पर्यायाकडे धाव
रिक्षा, चारचाकीमध्ये सीएनजी गॅसचा वापर बहुतांशी ठिकाणी वाढला आहे. हा गॅस प्रतिकिलो ६५ रुपये मिळत आहे. यावर त्या वाहनास दुप्पट मायलेज मिळत आहे. कराचा बोजा कमी केला तर हाच गॅस ५० रुपये प्रतिकिलो मिळेल. काही कंपन्यांच्या दुचाकीही आता सीएनजीवर चालणाऱ्या येऊ लागल्या आहेत, तर इलेक्ट्रिक चारचाकी, दुचाकी बाजारातील विक्रीचा टक्काही वाढू लागला आहे. या पर्यायांकडेही लोकांचा ओढा वाढला आहे. त्याची चौकशीही सातत्याने लोक करीत आहेत.
कोट
केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात ताळमेळ नसल्याने कराचा बोजा पेट्रोल आणि डिझेलवर वाढत आहे. त्याचा थेट परिणाम वाहनधारकांवर होत आहे. इंधन ही बाब चैनीची न होता गरजेची बाब बनली आहे.
- गजकुमार माणगावे,
अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा पेट्रोल, डिझेल असोसिएशन.