कोल्हापूर : महानगरपालिकेच्या ११ नागरी आरोग्य केंद्रांत स्वॅबची तपासणी रविवारपासून पुन्हा सुरू करण्यात आली. कोरोना चाचणी करण्यास आयसोलेशन रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागल्याने नागरी आरोग्य केंद्रातही स्वॅब घेण्यास सांगण्यात आले. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी महापालिकेचे आयसोलेशन रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण तसेच स्वॅब तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयसोलेशन येथे स्वॅब तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याठिकाणी नागरिकांना बराच वेळ स्वॅब तपासणीसाठी लाईनमध्ये उभे राहावे लागत आहे. त्यामुळे रविवारपासून नागरी आरोग्य केंद्रातही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. नागरी आरोग्य केंद्रात एकीकडे लसीकरण, तर दुसरीकडे स्वॅब तपासणी होणार आहे.
शहरातील नागरिकांनी आयसोलेशन येथे एकाच ठिकाणी गर्दी न करता राहत असलेल्या परिसरातील महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये आपले स्वॅब द्यावेत, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.