कोल्हापूर : राज्यात नवीन सरकार येऊन महिना उलटला तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. सामान्य माणसांची कामे ठप्प झाली असून, मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता जनतेलाच मोर्चे काढावे लागतील, असा टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना भाजपला लगावला.आमदार पाटील म्हणाले, राज्यात पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची मागणी असताना त्याबाबत निर्णय घेण्यासाठी कोणी मंत्रीच नाही. किमान भाजप व शिंदे गटाचे चार -चार मंत्री घेऊन कामांना गती दिली पाहिजे. याउलट हजारो कोटींच्या कामांना स्थगिती देऊन राज्य सरकारने नेमके काय साधले? रस्ते, धरणे आदी सामान्य माणसांचीच ही कामे होती. कर्मचाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नती थांबवल्या आहेत. एकूणच राज्याचा कारभार ठप्प झाल्याने आता जनतेलाच याबाबत मोर्चा काढावा लागणार आहे.
जि. प.साठी शक्य तिथे आघाडीजिल्हा परिषद, महापालिका निवडणूका यापूर्वी स्वबळावर लढलो आहे. आता जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी दोन्ही काँग्रेस, शिवसेना एकत्रितपणे लढण्यासाठी माझी तयारी असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
‘ते’ मंडलिक, मानेंनी सांगावे
कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासह नाईट लँडिंगसाठी कोणी प्रयत्न केले, केंद्रीय मंत्र्यांच्या कोणी गाठीभेटी घेतल्या, हे खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांनी सांगावे. पत्र आल्यानंतर कोणी श्रेय घेत असेल तर त्यावर आपण काय बोलणार? असा सवालही आमदार पाटील यांनी केला.
ठाकरेंना फसवणाऱ्यांना भविष्यात कळेलशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फसवूून सत्तेवर आले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला हे आवडलेले नाही. भविष्यातील निवडणुकीत हे चुकीचे घडले, हे त्यांच्या लक्षात येईल, असे आमदार पाटील यांनी सांगितले.