कोल्हापूर : जिल्ह्यातील राजकीय भविष्याची लॉटरी असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित झाली असून, उद्या, शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ होईल. दुपारी बारा वाजेपर्यंत कोल्हापूरच्या राजकारणात कोणाचे ‘बारा’ वाजणार, याचा फैसला होईल. दरम्यान, उद्याची मतमोजणी सुरळीतपणे, तसेच पारदर्शकपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी मतमोजणी कर्मचार्यांना केले आहे. शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीत होणार्या लोकसभा निवडणुकीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली. आज, गुरुवारी ही यंत्रणा मतमोजणीकरिता सज्ज झाली. शाहू स्मारक भवनाच्या सभागृहात आज कर्मचार्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण व रंगीत तालमीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात कोल्हापूर, तर दुपारच्या सत्रात हातकणंगले मतदारसंघातील मतमोजणीचे काम करणार्या कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रोजेक्टरद्वारे मतमोजणी कशी करायची, याची माहिती व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यावेळी काही तांत्रिक माहिती कर्मचार्यांना देण्यात आली. मतदान यंत्र कसे खोलायचे, त्याचे आकडे कसे घ्यायचे, कोणते फॉर्म कसे भरायचे, याची इत्थंभूत माहिती यावेळी देण्यात आली. या प्रशिक्षणास तसेच मोजणीच्या रंगीत तालमीस काऊंटिंग असिस्टंट, काऊंटिंग सुपरवायझर, मायक्रो आॅब्जर्व्हर, असे कर्मचारी उपस्थित होते. मतमोजणीच्या सुरुवातीला पोस्टल मतपत्रिका मोजल्या जाणार आहेत. त्यासाठी दोन मतदारसंघांसाठी दोन स्वतंत्र टेबल ठेवण्यात आले आहेत. पोस्टल मते मोजण्यास सुरुवात झाल्यानंतर अर्ध्या तासाने मतदान यंत्रांवरील मोजणी सुरू होणार आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबल ठेवण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त असेल, पण केंद्रात कोणीही पोलीस कर्मचारी असणार नाही. तसे स्पष्टीकरण आज देण्यात आले. (प्रतिनिधी)
आता निकालाची प्रतीक्षा मतमोजणीची तयारी पूर्ण : कर्मचार्यांना दोन सत्रांत प्रशिक्षण
By admin | Published: May 16, 2014 12:36 AM