सांगली : जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेत भाजपला साथ देणाऱ्या रयत विकास आघाडी, शिवसेना, अजितराव घोरपडे गट यांना सभापतिपदाचे बक्षीस दिले जाणार आहे. आ. विलासराव जगताप, आ. सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर या गटांनाही सामावून घेतले जाणार असल्याचे संकेत आहेत. विषय समितींच्या निवडी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेत यंदा प्रथमच कमळ फुलले. सर्वात जास्त २५ सदस्य संख्या भाजपकडे होती. राष्ट्रवादीकडे १४, काँग्रेस १०, रयत विकास आघाडी ४, शिवसेना ३, अजितराव घोरपडे गट २, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्ष प्रत्येकी एक अशी एकूण ६० सदस्य संख्या आहे. निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच होती. शिवसेना, रयत विकास आघाडी किंगमेकर ठरले. रयत आघाडीच्या चार सदस्यांनी सर्वप्रथम पाठिंबा दिला. नंतर आ. अनिल बाबर यांनी शिवसेनेच्या तीन सदस्यांचा पाठिंबा दिल्याने भाजप बहुमतापर्यंत पोहोचला. खा. राजू शेट्टी समर्थक एक व घोरपडे गटाच्या दोन सदस्यांनीही त्यांना पाठिंबा दिला.भाजपच्या पंचवीस सदस्यांमध्ये आ. विलासराव जगताप यांचे सहा, तर आ. सुरेश खाडे यांचे चार सदस्य निवडून आले आहेत. जगताप व खाडे यांनी काँग्रेसला जोरदार शह देत सदस्य निवडून आणले आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या प्रत्येकी एकाच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडणार आहे. जगताप गटाकडून सरदार पाटील (दरीबडची), तमनगौडा रवी (जाडरबोबलाद) आणि स्नेहलता जाधव (शेगाव) यांची नावे चर्चेत आहेत.आ. खाडे यांच्या मतदारसंघातून अरुण राजमाने (मालगाव), शिवाजी डोंगरे (कवलापूर) आणि शोभा कांबळे (हरिपूर) यांच्या नावांची चर्चा आहे. गोपीचंद पडळकर गटालाही आटपाडी तालुक्यातून संधी मिळण्याची शक्यता आहे.रयत विकास आघाडीचे चार सदस्य आहेत. नानासाहेब महाडिक यांचे पेठचे जगन्नाथ माळी आणि येलूरमधून फिरोज मुलाणी असे दोन सदस्य निवडून आले आहेत. सी. बी. पाटील यांनी सुरेखा जाधव यांना निवडून आणले. वाळव्यातून वैभव नायकवडी यांच्या भावजय प्रा. डॉ. सुषमा नायकवडी या सदस्या आहेत. प्रा. नायकवडी यांना निश्चित संधी मिळणार आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या आघाडीच्या संगीता नलवडे (देशिंंग) आणि आशा पाटील (रांजणी) या दोन महिला सदस्या आहेत. त्यामध्ये नलवडे यांचे पारडे जड आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुरेखा आडमुठे सदस्या आहेत. त्यांनीही भाजपला मतदान केले आहे, त्यामुळे त्यांनाही सभापतिपदाची लॉटरी लागू शकते. सभापतिपदाच्या निवडी २ एप्रिलला होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांकडे स्थायी समिती आणि जलव्यवस्थापन समिती ही दोन महत्त्वाची पदे राहतात. उपाध्यक्षांकडे शिक्षण आणि अर्थ या विभागांचा कार्यभार आहे. बांधकाम व आरोग्य विभाग, कृषी व पशुसंवर्धन, समाजकल्याण विभाग आणि महिला बालकल्याण विभाग सभाापती अशी चार सभापतीपदे आहेत. (प्रतिनिधी)सभापतिपदाचे संभाव्य दावेदार... विलासराव जगताप गट - सरदार पाटील (दरीबडची), तमनगौडा रवी (जाडरबोबलाद), स्रेहलता जाधव (शेगाव).सुरेश खाडे गट - अरुण राजमाने (मालगाव), शिवाजी डोंगरे (कवलापूर) व शोभा कांबळे (हरिपूर).रयत विकास आघाडी - प्रा. सुषमा नायकवडी (वाळवा), जगन्नाथ माळी (पेठ), फिरोज मुलाणी (येलूर) स्वाभिमानी विकास आघाडी - संगीता नलवडे (देशिंंग), आशा पाटील (रांजणी).
आता सभापती निवडीचे वेध
By admin | Published: March 22, 2017 11:41 PM