संतोष मिठारी ।कोल्हापूर : हेल्दी (आरोग्यदायी) असूनही केवळ उग्र वासामुळे शेपू या भाजीला अनेकजण नाक मुरडतात. मात्र, आता त्यांना ‘शेपू’ची भाजी खाकºयाच्या स्वरूपात खाता येणार आहे. कोल्हापुरातील श्रद्धा कुलकर्णी यांनी संशोधनातून पौष्टिक खाकºयाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
येथील छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस एज्युकेशन अॅँड रिसर्च (सायबर) ट्रस्टच्या कॉलेज आॅफ नॉन-कन्व्हेन्शियल व्होकेशनल कोर्सस फॉर वुमेनमध्ये सहायक प्राध्यापिकापदी कुलकर्णी कार्यरत आहेत. या महाविद्यालयातील फूड टेक्नॉलॉजी अॅँड मॅनेजमेंट विभागात पोषणशास्त्र (न्यूट्रिशन) विषय त्या शिकवितात. बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांमधील आहाराबद्दलची जागरूकता वाढत आहे. संपूर्ण आरोग्य अनुभविण्यासाठी पौष्टिक पदार्थांकडे कल वाढत चालला आहे. त्यानुसार सर्व पोषणमूल्ये मिळतील असा खाकरा हा पदार्थ सहायक प्राध्यापिका कुलकर्णी यांनी सहा महिन्यांच्या संशोधनातून तयार केला आहे.
त्यांनी हे संशोधन डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या शिवाजी विद्यापीठातील आविष्कार संशोधन महोत्सवात पहिल्यांदा सादर केले. खाकरा हा गुजरातमधील प्रसिद्ध पदार्थ असला, तरी महाराष्ट्रातही तो आवडीने खाण्यात येतो. खाकरा हा साधारणत: गव्हाचे पीठ वापरून केला जातो.
मात्र, शेपूपासून बनविलेल्या खाकºयामध्ये गव्हाच्या पिठासह बाजरी, बेसनाचे पीठही वापरले आहे. बाजरीमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते. गव्हातून ऊर्जा, प्रथिने तसेच बेसनमधूनही चांगले प्रथिने मिळतात. त्यामुळे हा खाकरा पौष्टिक ठरणारा आहे.खाण्यास पौष्टिकश्वसनाचे विकार कमी करणे, महिलांच्या मासिक धर्माचे नियमन, हाडांचे आरोग्य, रोगप्रतिकारक्षमता वाढविणे, आदींबाबत शेपू उपयुक्त ठरणार आहे. मात्र, केवळ शेपूचा उग्र वास येत असल्याने तिचे सेवन करणे अनेकजण टाळतात. आरोग्यदृष्ट्या पौष्टिक असणाºया या शेपूचे सेवन वाढावे, या उद्देशातून शेपूच्या वापरातून खाकरा तयार केला असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, सहा महिन्यांच्या संशोधनातून हा खाकरा साकारला आहे. यातील काही संशोधनासाठी माझ्या विद्यार्र्थिनींचीही मदत झाली. शेपू आणि गहू, बाजरी व बेसनाचे पीठ, आले, लसूण, मिरची पेस्ट व मीठ एकत्र करून नेहमीप्रमाणे हा पौष्टिक खाकरा तयार करावा. या खाकºयातून शरीरासाठी उपयुक्त असणारी प्रथिने, कॅलरी (ऊर्जा), फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस आणि लोह चांगल्या प्रमाणात मिळते. हवाबंद डब्यात ठेवल्यास हा खाकरा एक महिना टिकतो.